रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील रोझोदा येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश राजेंद्र मेढे हे वाघोदा येथून निंभोऱ्याकडे त मोटारसायकलचा क्रमांक एमएच १९ ईएन २५१५ या दुचाकीने जात असताना वाघोदा-निंभोरा रस्त्यावरील शनिमंदिराजवळ तसेच विजय बाजीराव पाटील यांच्या शेतालगत आज दुपारी सुमारे ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान अचानक रस्त्यावरील झाड अंगावर कोसळल्याने शैलेश राजेंद्र मेढे यांचा जागीच अपघाती मृत्यू झाल्याची घटना दिनांक 8 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.
(ads)
ही बातमी गावात पसरताच संपूर्ण परिसर हळहळला असून नागरिकांकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून झाड हटविण्याची कार्यवाही सुरू केली. वादळामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
त्यांच्या अकाली जाण्याने समाजामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे वडील हे राजेंद्र बळीराम मेढे.. आंबेडकरी चळवळी चे जेष्ठ कार्यकर्ते असून त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि लहान मुलं आहे. शैलेश राजेंद्र मेढे यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 9 मे रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता, रोझोदा तालुका रावेर येथे संपन्न होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा ऐरणीवर!
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावरील धोकादायक आणि वाळलेली झाडे हटवण्याबाबत 'पीडब्ल्यूडी' (PWD) विभागाकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले.
"अजून किती बळी घेतल्यावर बांधकाम विभागाला जाग येईल?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्त्यावरील धोकादायक झाडे आणि झुडपे हटवावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे



