रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर व यावल तालुक्यात १ जून २०२६ रोजी आलेल्या जोरदार वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई व सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद जाधव-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
(ads)
वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केळी हे या भागातील प्रमुख नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानाची अचूक नोंद घ्यावी तसेच शासनाने विशेष बाब म्हणून १०० टक्के नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी आमदार जावळे यांनी केली आहे.
(ads)
यासंदर्भात आमदार अमोल जावळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा कृषी क्षेत्राशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही स्वतंत्र निवेदन सादर करून रावेर-यावल परिसरातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली आहे.
(ads)
शेतकऱ्यांना संकटाच्या काळात शासनाची भक्कम साथ मिळावी आणि नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आमदार जावळे यांनी व्यक्त केली आहे.


