जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे हतनूर मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. परिणामी शनिवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजेपर्यंत धरणाचे २४ दरवाजे प्रत्येकी एक मीटरने उघडण्यात आले.
तापी नदीपात्रात ५२ हजार ९०२ क्युसेक (१,४९८ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
(ads)
धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण पर्जन्यमान ७६ मिलिमीटरपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
सध्या हतनूर धरणाची पाणीपातळी २१२.०४० मीटर असून धरणाची पूर्ण संचय पातळी २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण जलसाठा २८२.६० दशलक्ष घनमीटर (७२.८३ टक्के), तर उपयुक्त जलसाठा १४९.६० दशलक्ष घनमीटर (५८.६७ टक्के) इतका झाला आहे.
(ads)
धरणातून तापी नदीपात्रात ५२ हजार ९०२ क्युसेक (१,४९८ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू असून कालव्यातून ३०० क्युसेक (८.५० क्युमेक्स) पाणी सोडण्यात येत आहे.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज ; 'या' तालुक्यांमध्ये मुसळधार बरसणार
नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे


