कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


बहिणाबाईंच्या जीवनचरित्रावरील संशोधन, शेती आणि विशेषतः केळी संशोधनाशी संबंधित उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच ए.पी.जे. अब्दुल कलाम भवनातील अत्याधुनिक सुसज्ज सभागृहाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज रविवारी दि. ५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न झाले. या ऐतिहासिक समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय एल. माहेश्वरी होते.

(ads)

यावेळी मंचावर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर दीपमाला काळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, नितीन झाल्टे, ॲड. अमोल पाटील, प्रा. सुरेखा पालवे, प्रा. पवित्रा पाटील, अधिष्ठाता प्रा. जगदीश पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील, अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

(ads)

उद्घाटकीय भाषणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जीवन आणि साहित्य संपूर्ण समाजाला दिशा देणारे असून विद्यापीठात उभारण्यात आलेला हा अर्धाकृती पुतळा केवळ स्मारक नसून भावी पिढीला प्रेरणा देणारे दीपस्तंभ ठरेल. बहिणाबाईंचे तत्वज्ञान हे एक विद्यापीठ असून महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बहिणाबाईंच्या जीवनसंघर्षाची आणि विचारांची प्रेरणा येथे सातत्याने मिळेल. यावेळी त्यांनी बहिणाबाईंची प्रसिद्ध कविता "माझी माय सरस्वती माले शिकवते बोली" सादर करत मातृभाषा, शिक्षण आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.

(ads)

तसेच त्यांनी विद्यापीठात 'बाळासाहेब ठाकरे सेंटर फॉर एक्सलन्स' उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व विद्यार्थी वसतिगृहाची इमारत विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. बहिणाबाईंच्या जीवनचरित्रावरील संशोधन, शेती आणि विशेषतः केळी संशोधनाशी संबंधित उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

(ads)

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यापीठ परिसरात उभारलेला बहिणाबाईंचा पुतळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. खानदेशी भाषा समृद्ध असून तिच्याविषयी न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. उलट खानदेशातील विविध बोलीभाषांवर संशोधन होऊन त्यांचे संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

(ads)

विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी बहिणाबाईंच्या साहित्याचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी जैन इरिगेशनच्या बहिणाबाई ट्रस्ट आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. बहिणाबाईंच्या कविता अधिकाधिक भाषांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

(ads)

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मनोगत व्यक्त करताना बहिणाबाईंच्या जीवनातून प्रतिभेला कोणत्याही प्रकारची सामाजिक किंवा शैक्षणिक मर्यादा अडथळा ठरू शकत नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश मिळतो, असे सांगितले. अहिराणी आणि लेवा यांसारख्या स्थानिक बोलीभाषांचे संवर्धन अत्यावश्यक असून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अहिराणी भाषेच्या भाषांतराची सुविधा विकसित करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

(ads)

सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांनी बहिणाबाईंच्या कविता त्यांच्या मूळ बोलीभाषेतच जतन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या साहित्याचे आधुनिकीकरण करताना मूळ भाषेचे सौंदर्य आणि वैशिष्ट्य अबाधित राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठात उभारण्यात आलेले हे स्मारक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असेही ते म्हणाले.

(ads)

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बहिणाबाईंच्या अर्धाकृती पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे तसेच समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. बहिणाबाईंच्या कविता या अनुभवातून जन्माला आलेल्या असून डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही त्यांचे जीवनतत्त्वज्ञान विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित मार्गदर्शन करणारे आहे. या पुतळ्यामुळे विद्यार्थ्यांना बहिणाबाईंच्या कार्याची नव्याने ओळख होऊन त्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(ads)

यावेळी 'केळी निर्यात व्यवस्थापन' या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या सिलेज प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या सिलेज निट्रो बॅक आणि सिलेज ब्ल्यूटी या उत्पादनांच्या माहितीपत्रकांचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

(ads)

कार्यक्रमात विद्यापीठ आणि आयआयटी चेन्नई यांच्यातील करारा अंतर्गत विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रशिक्षण अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. 

समारंभात बहिणाबाई चौधरी अर्धाकृती पुतळा बाबत विदयापीठस्तरीय समितीच्या अध्यक्ष व सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये समितीचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, प्रा. व. पू. होले, किशोर चौधरी, आर्किटेक्ट नितीन पारगावकर, मूर्तिकार दीपक थोपटे, यशवंत गरुड आणि अभियंता राहुल पाटील यांचा समावेश होता. तसेच ए.पी.जे. अब्दुल कलाम भवनातील सभागृह उभारणी बद्दल अभियंता एस. आर. पाटील, आर्किटेक्ट योगेंद्र गुजराथी, अभियंता बी. डी. पाटील, अभियंता सुनील नेमाडे, कंत्राटदार राकेश पाटील आणि अमर कासट यांचाही सत्कार करण्यात आला. 

(ads)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन खेमराज पाटील आणि प्रा. वीणा महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले. या समारंभास विद्यापीठाचे ‍अधिसभा सदस्य दीपक पाटील, नितीन ठाकूर, केदारनाथ कवडीवाले, प्रा.एच.एम.पाटील यांच्यासह इतर अधिसदस्य, विद्या परिषद व विविध प्राधिकरणांचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!