चिनावल तालुका रावेर (प्रतिनिधी):
चिनावल येथील भीम ज्योती बुद्ध विहार येथे वर्षावासाच्या आठव्या दिवशी (अष्टमी) धार्मिक वातावरणात धम्मदेसना व खीरदान कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी पूजनीय भदंत नागवंश यांनी उपस्थित उपासकांना बौद्ध धम्मातील १० संस्कार आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या धम्मदेसनेत भदंत नागवंश (महाथेरो) यांनी दैनिक व्यवहारातील विविध उदाहरणे देत अत्यंत सोप्या भाषेत बौद्ध उपासकांचे १० संस्कार कसे असावेत आणि त्याचे आचरण कसे करावे, हे पटवून दिले. या कार्यक्रमास सुमारे १५० हून अधिक धम्म उपासक व उपासिका श्रद्धेने उपस्थित होत्या. धम्मदेसनेनंतर सर्व उपस्थित भाविकांसाठी खीरदानाचा कार्यक्रम पार पडला.
आगामी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिनांक १५ व १६ ऑगस्ट रोजी भीम ज्योती बुद्ध विहार येथे ‘अनिवासी दोन दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात बौद्ध धम्माची मूलभूत तत्त्वे आणि आचरणाविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त बौद्ध धम्म उपासक व उपासिकांनी या दोन दिवसीय शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भीम ज्योती बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयुष्यमान संजय भालेराव व सर्व समिती सदस्यांनी केले आहे.



