चिनावल (किरण भिमराव भालेराव):
रावेर तालुक्यातील चिनावल येथील भीम ज्योती बुद्ध विहार समिती व उपासक-उपासिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर अत्यंत प्रेरणादायी आणि मंगलमय वातावरणात नुकतेच पार पडले. या शिबिराला गावातील व परिसरातील धम्म उपासक-उपासिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
(ads)
धम्म मूल्यांचे आचरण हीच खरी प्रगती: भदंत नागवंश
शिबिराचे मुख्य मार्गदर्शक पूजनीय भदंत नागवंश यांनी उपस्थित श्रद्धालूंना धम्म मूल्यांवर सखोल आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला, यामागील ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी स्पष्ट करताना ते म्हणाले, "केवळ स्वतःला 'बौद्ध' म्हणवून घेणे म्हणजे बौद्धत्व नव्हे; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आणि शिकवणीचे प्रत्यक्ष आचरण करणे हीच खरी धम्म प्रगती आहे." या वेळी त्यांनी 'दान पारमिता' व 'पंचशील' या तत्त्वांचे महत्त्व दैनंदिन आयुष्यातील उदाहरणे देऊन पटवून दिले.
(ads)
या प्रसंगी नागपूर येथील प्रमुख पाहुणे प्रा. आयुष्यमान ललित कुमार कांबळे यांनी धम्म प्रसाराची गरज आणि युवकांची भूमिका यावर आपले विचार मांडले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश: 'बोधी वृक्ष' सप्रेम भेट
पर्यावरण आणि निसर्गाशी नाते अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने, गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. ज्योती संजय भालेराव यांच्या हस्ते शिबिरातील प्रत्येक उपासक व उपासिकेला 'बोधी वृक्ष' (पिंपळाचे रोप) सप्रेम भेट देण्यात आले. शिबिराची आठवण जपण्यासोबतच निसर्ग संवर्धनाचा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.
(ads)
पुढील शिबिरांची मागणी
चिनावल येथील बुद्ध विहारामध्ये २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पवित्र वर्षावास सुरू आहे. या काळात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे बौद्ध धम्माच्या विचारांचे पुनरुज्जीवन झाल्याची भावना बाहेरगावाहून आलेल्या उपासकांनी व्यक्त केली. तसेच भविष्यातही अशाच प्रकारच्या अभ्यासपूर्ण प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
(ads)
समितीचे योगदान
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भीम ज्योती बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष संजय भालेराव, नितीन भालेराव, किरण भालेराव, दशरथ भालेराव, शेषराज भालेराव, आनंद ठाकरे, गणेश भालेराव, अजय भालेराव तसेच सरपंच सौ. ज्योती भालेराव, सविता भालेराव, माधुरी भालेराव, सीमा भालेराव, कल्पना भालेराव, सारिका भालेराव, सोनाली सपकाळे, योगिता लोखंडे आणि मीना भालेराव यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी समितीच्या वतीने उपस्थितांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले.



