जात , धर्म , देश , भाषा आदींच्या मर्यादा तोडून अजरामर झालेल्या प्रा. यास्मिन शेख

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


     इस्राईल व पॅलेस्टाईन संघर्षातून अनेक ज्यू लोक विविध देशांमध्ये विस्थापित झाले . भारतातही काही ज्यू स्थाईक झाले . जॉन रूबेन हे पॅलेस्टाईन मधून आपल्या कुटुंबासह भारतात ( मुंबई ) आले . त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी मिळाली असता ते नाशिक येथे स्थायिक झाले असता दिनांक २१ जून १९२५ ला त्यांना मुलगी झाली तिचे नाव त्यांनी जेरूषा असे ठेवले . ( पुढं विवाहा नंतर हे नाव यास्मिन शेख असे झाले ) जेरुषा हा हिब्रू शब्द असून त्याचा मराठी अर्थ ' वारसा ' असा होतो . जॉन रूबेन यांची नोकरी निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असल्याने त्यांच्या मुलीचे शिक्षण विविध ठिकाणी होत गेले . जॉन धर्माने ज्यू असले तरी त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती , मराठी भाषा , चाली , रीती एवढ्या आत्मसात केल्या की ते मुळ महाराष्ट्रीयन वाटायचे . त्यांचा तोच वारसा त्यांच्या मुलीने चालविला . जेरूषा रूबेन यांनी त्यांचे प्राथमिक ते एम. ए. पर्यंतचे शिक्षण मराठीतच केले . इथली भाषा , चाली , रीती , रिवाज त्यांनी अस्सल मराठमोळ्या प्रमाणे आत्मसात केल्या . मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविले . माझी मातृभाषा मराठी आहे असे शासकीय अधिकाऱ्यास लिहावयास भाग पाडले . 

 (ads) 

 पुणे येथील एस. पी. महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांची प्रा. एस. एम. माटे व प्रा. के. एन. वाजवे यांच्याशी ओळख झाली . मराठी व्याकरण त्या माटे यांच्याकडून शिकल्या व त्यांना मराठी व्याकरणाची एवढी गोडी वाटायला लागली की , त्यांनी पुढील काम याच विषयावर केले . मराठी एम. ए. झाल्यानंतर त्यांना औरंगाबाद ( छत्रपती संभाजी महाराज नगर ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापिका म्हणून नोकरी मिळाली . सुमारे दहा वर्षे इथे नोकरी केल्या नंतर त्या सायन येथील ए. आय. इ. एस. महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या . 

 (ads) 

 नाशिकला असताना प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्या भेटीला त्या त्यांच्या वडिलांसोबत गेल्या असता कानेटकर जेरुषा रूबेन यांची मराठी भाषा , मराठी नाटक , मराठी व्याकरण ई. विषयी असलेली रुची पाहून अचंबित झाले . या भेटीतून ते खूप प्रभावी झाले . पुढं कानेटकर हे जेरुषा यांचा परिचय नाशिक चित्रमंदिर येथे कामाला असलेल्या व मराठी नाटकाविषयी प्रचंड आवड असणाऱ्या अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी करून देतात व पुढं १९४९ मध्ये तेच या दोघांचा आंतर धर्मीय विवाह घडवून आणतात . हा विवाह नोंदणी पद्धतीने केला जातो . विवाहा नंतर त्या जेरूषा जॉन च्या यास्मिन शेख होतात . त्यांचा विवाह मुस्लिम तरुणाशी झाला असला तरी त्यांनी त्यांचा धर्म बदलविला नाही . त्यांनी धर्मांतर विधी केलेला नाही फक्त नावाचे अधिकृत नामांतर केलेले आहे . असे असले तरी मुस्लिम धर्माचे सर्व सण त्या साजरे करत , विविध प्रथा , परंपरा यांचे पालन करत असत . असे असले तरी त्या पाच वारी साडी नेसत व बॉब कट ठेवत असत . त्याच पेहरावात त्या महाविद्यालयात मुलांना शिकवत असत . एक मुस्लिम स्त्री अश्या पेहरावात पाहून व मराठी भाषेवरील पकड पाहून विद्यार्थी अचंबित होत असत. यास्मिन शेख यांना दोन मुली होतात , एकीचे नाव शमा ठेवले जाते ती पुढं डॉक्टर होते तर दुसरी रुकसाना ही प्राध्यापक होते . या मुली सुद्धा आंतर धर्मीय विवाह करतात . ज्यू , मुस्लिम , सिंधी , हिंदू ( ब्राम्हण ) अश्या चार धर्माचे हे कुटुंब असते . जात, धर्म , भाषा , प्रांत , वंश असा कोणताच भेदभाव त्या मानत नसत. मानवतावाद सर्वश्रेष्ठ आहे असे त्यांचे मत होते .

(ads) 

     सायन येथील महाविद्यालयातून मराठी विभागाच्या प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या नंतर यास्मिन शेख या पुणे जवळ असलेल्या औंध या गावी स्थाईक होतात . तिथं त्या भाषा शास्त्र , मराठी व्याकरण या विषयाच्या खासगी वर्ग चालवतात . आय. ए. एस. , यू. पी.एस.सी. , एम. पी. एस. सी. चे विद्यार्थी त्यांच्याकडं शिक्षण घेऊ लागले . त्यांनी १९९७ मध्ये ' मराठी लेखन मार्गदर्शिका ' , २००७ मध्ये ' मराठी शब्द लेखन कोश ' , २००९ मध्ये ' सुगम मराठी व्याकरण कोश ' या पुस्तकांची निर्मिती केली . ही सर्व पुस्तकं आजही प्रसिद्ध असून त्यांच्या आवृत्या निघत आहेत . तसेच पुणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या ' अंतर्नाद ' या मासिका करिता ' व्याकरण सल्लागार ' म्हणून काम करतात . नियतकालिकांमध्ये व्याकरण सल्लागार म्हणून काम करणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती होय . 

 (ads) 

  यास्मिन शेख या प्रमाण भाषा व बोली भाषा यात फरक केला पाहिजे असा आग्रह धरतात . योग्य ठिकाणी योग्य भाषेचा वापर हा व्हायलाच पाहिजे असे त्यांचे प्रामाणिक मत होते . प्रसार माध्यम , साहित्य , शिक्षण संस्था यांमध्ये एकच प्रमाण भाषा असायला हवी अशी त्यांनी मागणी केलेली आहे . १९६० मध्ये मराठी भाषा अधिक समृध्द व्हावी म्हणून ' महाराष्ट्र साहित्य महामंडळ ' ची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाद्वारे मराठी व्याकरण विषयी वेळोवेळी नियमावली तयार करण्यात आली आहे व शासनाने त्यास मंजुरी दिलेली आहे . १९६२ , १९७४ मध्ये ऱ्हस्व , दीर्घ बाबत जवळ जवळ २४ नियम तयार करण्यात आलेले आहेत . असे असले तरी त्यात अजून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असे ठाम मत यास्मिन शेख यांचे होते . मराठी भाषेत एकाहून एक चांगले शब्द असताना आपण उगीच इंग्रजी शब्दांचा वापर करत आलो आहोत असेही त्यांचे मत होते . अलीकडं मराठी भाषेत हिंदी , इंग्रजी भाषेचा मोठयाप्रमाणात शिरकाव झालेला असून तो रोखला गेला पाहिजे असेही ते सांगत असत . 

(ads) 

     पॅलेस्टाईन संस्कृतीच्या असलेल्या , धर्माने ज्यू असलेल्या , विवाह करून मुस्लिम ओळख असलेल्या यास्मिन शेख आपले संपूर्ण आयुष्य मराठी भाषा , मराठी व्याकरण अधिकाधिक शुद्ध करण्या करिता खर्ची घालून आपली वेगळीच ओळख निर्माण करतात . अनेक दिग्गज मराठी प्राध्यापकांना , साहित्यिकांना लाजवेल एवढे त्यांचे मराठीवर प्रभुत्व होते . अश्या या महिलेचे वयाच्या १०१ व्या वर्षी दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले . त्यांच्या निधनाने मराठी भाषेचे , मराठी व्याकरणाचे अपरिमित नुकसान झाले असून सारा महाराष्ट्र व मराठी भाषिक त्यांचे ऋण कधीही फेडू शकणार नाही . 


लेखक ..... जयसिंग वाघ 

      अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक , जळगाव 

संपर्क ..... ९८८१९२८८८१

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!