रावेरमध्ये दिवसा घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद : गुन्हे शोध पथकाची कारवाई; ३ तोळे सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोकड हस्तगत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर (सुवर्ण दीप वृत्तसेवा) : रावेर शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरात दिवसा बंद घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे ३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. क्र. ४३०/२०२६, भा.न्या.संहितेच्या कलम ३०५, ३३९(३), ३(५) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(ads)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्पना सुभाष वाणी या अंगणवाडी सेविका असून त्या रावेर शहरातील मधुसूदन मेडिकलसमोर, जुनी नगरपालिका रोड परिसरात वास्तव्यास आहेत. त्या दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून कामानिमित्त अहिरवाडी येथे गेल्या होत्या. दुपारी सुमारे २ वाजता घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला.

(ads)

घरातील मौल्यवान वस्तू तपासल्या असता ५० हजार रुपये रोख, २ तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट आणि प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, असा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

गुन्हा दाखल होताच रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने रावेर शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. दिवसा चोरी झाल्याने तपासात काही अडचणी येत होत्या. मात्र, एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित आरोपींचे चेहरे स्पष्टपणे कैद झाले.

(ads)

या फुटेजच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर रितेश रविंद्र नेवे (वय ३१), रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, कलेक्टर बंगल्याच्या मागे, जळगाव आणि गजेंद्र सोपान चौधरी (वय ३८), रा. मामुराबाद, इंदिरानगर, ईदगाह रोड, ता. जि. जळगाव, ह.मु. सिलवासा, जि. नगर हवेली यांना दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली.

(ads)

पोलिसांनी आरोपींची सखोल चौकशी केली असता, आरोपी रितेश नेवे हा फिर्यादी महिलेच्या बहिणीचा मुलगा असल्याचे समोर आले. फिर्यादी व त्यांची बहीण मागील काही वर्षांपासून संपर्कात नसल्याने फिर्यादी घरात एकट्याच राहत असल्याची माहिती आरोपी रितेशला होती. याच परिस्थितीचा फायदा घेत त्याने आपल्या मित्राच्या मदतीने घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

(ads)

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात आली. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यातील ३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, संभाजी बिजागरे, सुकेश तडवी आणि विकार शेख यांनी केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. हरिदास बोचरे करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!