ढोल-ताशांचा गजर, लेझिमचा ताल अन् भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप
मुंजलवाडी प्रतिनिधी : चंद्रकांत वैदकर
गणेशोत्सवाच्या नऊ दिवसांच्या भक्तिमय पर्वाची सांगता मुंजलवाडी येथे लाडक्या गणरायाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीने उत्साहात करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लेझिमचा ताल आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले.
(ads)
विसर्जन मिरवणुकीत जय बजरंग लेझिम मंडळ तसेच शिव मल्हार गणेश मंडळाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तरुणाईच्या जल्लोषपूर्ण सहभागामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली. गावातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक मार्गस्थ होत असताना ‘एक, दोन, तीन, चार, गणपतीचा जयजयकार’ अशा घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले.
(ads)
तडवी समाज बांधवांकडून गणेश मंडळांचा सत्कार
यावेळी तडवी समाज बांधवांच्या वतीने गावातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा नारळ व हार देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देण्यात आला.
(ads)
गणरायाचे आगमन झाल्यापासून नऊ दिवस भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्सव साजरा करण्यात आला. बाप्पा पुन्हा जाऊ नये, अशी भावना लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या मनात होती. मात्र, नऊ दिवसांच्या मुक्कामानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आणि भाविकांचे डोळे पाणावले.
(ads)
“देवा, आम्हास आज्ञा असावी,
चुकले आमचे काही तर क्षमा करावी;
आभाळ भरले होते तुम्ही येताना,
आता डोळे भरलेत पाहून तुम्हाला जाताना…”
या भावनिक वातावरणात गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांनी भक्तिभावाने लाडक्या गणरायाला निरोप दिला.
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन, मुंजलवाडी गावचे पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सहकार्यामुळे गणेश विसर्जन सोहळा आनंददायी आणि शांततेत संपन्न झाला.


