जळगाव जिल्हा प्रतिनिधी (नितीन इंगळे)
भुसावळच्या राजकारणात आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुंबईतील नंदवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे आणि निखिल संतोषभाऊ चौधरी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
(ads)
या राजकीय प्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणातील समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुसावळ आणि जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
(ads)
या प्रवेशावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील, पाचोरा आमदार किशोरअप्पा पाटील, चोपडा आमदार चंद्रकांतअण्णा सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील, पारोळा आमदार अमोल चिमणआबा पाटील, उपनेत्या सौ. सरिता माळी कोल्हे आणि जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचे नमूद करण्यात आले आहे.
(ads)
अनिल चौधरी आणि गायत्रीताई भंगाळे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळमध्ये आगामी काळात कोणते नवे राजकीय समीकरण आकाराला येणार? याकडे आता जळगाव जिल्ह्याचे राजकीय वर्तुळ आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.


