ऐनपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे ज्ञानगंगोत्री हस्तलिखित मंडळाच्या वतीने ‘ज्ञानगंगोत्री’ हस्तलिखित भिंतीपत्रिकेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
(ads)
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सर्जनशीलतेला चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन व साहित्यिक अभिरुची निर्माण व्हावी, या उद्देशाने या भिंतीपत्रिकेची निर्मिती करण्यात आली आहे.
(ads)
या भिंतीपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुर्जर भाषांमध्ये विविध विषयांवरील स्वलिखित साहित्य सादर केले. यामध्ये लेख, कविता, म्हणी, कहावते, विनोद, निबंध, शेरो-शायरी, घोषवाक्ये, सुविचार, मुहावरे आदी साहित्याचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या साहित्याचे परीक्षण करून आवश्यक मार्गदर्शन व सुधारणा करण्यात आली. त्यानंतर निवडक साहित्याचे भिंतीपत्रिकेत प्रकाशन करण्यात आले.
(ads)
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला, कल्पनाशक्तीला आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळाले असून, विद्यार्थ्यांमध्ये साहित्यनिर्मितीची आवड निर्माण होण्यास तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यास मदत होत आहे.
(ads)
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागप्रमुख तथा ज्ञानगंगोत्री हस्तलिखित मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. के. सोनवणे, डॉ. पी. आर. गवळी, प्रा. डॉ. नितीन बारी, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. अक्षय महाजन, प्रा. हर्षल म्हसाने तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले. याशिवाय काजल कोळी, कविता राजपूत, योगिता गोरडकर, कोमल धामोडकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. अनिकेत पाटील व श्री. श्रेयस पाटील यांनीही या उपक्रमासाठी सहकार्य केले.


