ऐनपूर महाविद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत परिसर स्वच्छ व सुंदर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



ऐनपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच भारत सरकारच्या राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय, पुणे यांच्या निर्देशानुसार ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, ऐनपूर संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा (SHS-2026)’ अभियान उत्साहात राबविण्यात येत आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असून ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानांतर्गत महाविद्यालयीन प्रांगण, वर्गखोल्या, ग्रंथालय तसेच परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

विविध परिसराची स्वच्छता व श्रमदान

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वर्गखोल्यांची स्वच्छता, ग्रंथालयातील पुस्तकांची सुयोग्य मांडणी व स्वच्छता तसेच महाविद्यालयीन प्रांगणाची साफसफाई करून परिसर स्वच्छ व सुंदर केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजविण्यासोबतच सामूहिक कृती, श्रमदान आणि लोकसहभागाची भावना विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यावेळी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी सांगितले की, “स्वच्छता ही केवळ एका दिवसाची किंवा एका अभियानाची बाब नसून ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील सवय बनली पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या या अभियानात प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प करावा.”

‘एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रमाचे नियोजन

या अभियानाचा एक भाग म्हणून दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या देशव्यापी श्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!