रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : शहरातील स्टेशन रोड परिसरात रावेर कोर्टाच्या पुढे आज दुपारी अचानक मधमाशांच्या मोठ्या थव्याने नागरिकांवर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत पुंडलिक कोळी हे गंभीर जखमी झाले असून अमोल कोंघे (वकील) यांना मधमाशांच्या दंशामुळे किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांवर रावेर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुंडलिक कोळी यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
(ads)
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन रोड परिसरात आज दुपारच्या सुमारास अचानक मधमाशांचा मोठा थवा नागरिकांच्या दिशेने आला. काही क्षणांतच मधमाशांनी नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरातील नागरिक व महिलांमध्ये घबराट निर्माण झाली. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
(ads)
दरम्यान, रावेरहून गाते येथे जात असलेले पुंडलिक कोळी हे कोर्टाच्या पुढे पायी जात असताना मधमाशांच्या तावडीत सापडले. मधमाशांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. याचवेळी अमोल कोंगे (वकील) यांनाही मधमाशांनी दंश केल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.
पुंडलिक कोळी यांची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले.
(ads)
दरम्यान, मधमाशांचा एवढा मोठा थवा अचानक नागरिकांच्या दिशेने कुठून आला, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी स्टेशन रोड परिसराची पाहणी करून मधमाशांचे पोळे किंवा संभाव्य धोका असल्यास आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


