रावेर प्रतिनिधी : OBC जनगणना २०२७ मध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून द्यावा तसेच जातनिहाय मोजणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग (OBC) मोर्चाच्या वतीने बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या दुसऱ्या चरणात जिल्हा व तालुका पातळीवर धरणे, निदर्शने आणि निवेदन देण्याचे कार्यक्रम घेण्यात आले.
(ads)
OBC जनगणनेत स्वतंत्र पर्याय न देणे तसेच जातनिहाय मोजणीसाठी ‘ड्रॉप-डाउन’ पर्याय उपलब्ध करून न देणे, हा ओबीसी समाजाची फसवणूक व अन्याय असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ओबीसी समाजाची अचूक संख्या आणि सामाजिक-आर्थिक स्थिती समोर येण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
(ads)
या आंदोलनाचा पहिला चरण २५ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या चरणात बुधवार, २ सप्टेंबर रोजी देशभरातील जिल्हा व तालुका मुख्यालयांवर आंदोलन करण्यात आले.
(ads)
रावेर तहसील कार्यालयासमोरही आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
(ads)
निवेदन देताना महेश तायडे (भारत मुक्ती मोर्चा), अशोक शिंदे (शिवसेना उपजिल्हा संघटक, उबाठा), किशोर पाटील (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), प्रशांत बोरकर (प्रदेशाध्यक्ष, जनकल्याण संघ), ई. जे. महाजन, श्रावण पाटील, विजय महाजन, निवृत्ती महाजन, सुनील सोनार, संजय चौधरी, कैलास धनगर, विजय धनगर, राहुल लहासे, मनोहर ससाणे, स्वप्नील महाजन, प्रतीक बेंडाळे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
(ads)
ओबीसींच्या हक्कांसाठी सुरू असलेले हे आंदोलन आगामी काळात आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असून, जातनिहाय जनगणना आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


