संपादकीय विशेष लेख : पंच्याहत्तरी मिलिंद महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभाची

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



      दिनांक ८ जुलै १९४५ रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ' पीपल्स एज्युकेशन सोसायटी ' ची स्थापना करून शाळा , महाविद्यालये सुरू केली आजमितीस मुंबई , नवी मुंबई , पुणे , औरंगाबाद , महाड , कोल्हापूर , बंगळूर अश्या विविध १५ ठिकाणी शाळा , महाविद्यालय , वसतिगृह सुरू असून सुमारे ४५००० विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत . सर्वप्रथम मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केल्या नंतर बाबासाहेबांनी औरंगाबाद ( आताचे छत्रपती संभाजी महाराज नगर ) येथे १९ जून १९५० रोजी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली . सुरवातीस जागेचा प्रश्न असल्याने भाडे तत्वावर छावणी भागात लष्करी बॅरेक मध्ये हे कॉलेज सुरू करण्यात आले . पहिल्याच वर्षी संस्थेला १ लाख ७६ हजाराची तूट सहन करावी लागली . 

   (ads)

    पीपल्स एज्युकेशन सोसायटी तर्फे शहरापासून ३ किलो मीटर अंतरावर १५० एकर जागा खरेदी केली व त्या जागेवर मिलिंद महाविद्यालयाची इमारत उभारण्यास दिनांक १ सप्टेंबर १९५१ रोजी प्रारंभ केला . या करिता कोनशिला बसविण्याचा कार्यक्रम या दिवशी घेण्यात आला. भारताचे पहिले राष्ट्रपती तथा संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सदर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. अत्यंत भव्य दिव्य सोहळा यादिवशी मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते . आज या घटनेस ७५ वर्षे पूर्ण झालीत . या सोहळ्यास हैद्राबाद संस्थानचे निजाम मिर उस्मान अली खान यांचे प्रतिनिधी , माईसाहेब सविता आंबेडकर प्रामुख्याने उपस्थित होते . या ऐतिहासिक कामा करिता बाबासाहेबांना उस्मानिया विद्यापीठाचे कुलगुरु नवाब अलियावर जांगबहाद्दुर , हैद्राबाद संस्थानचे माजी शिक्षणमंत्री राजा धोंडी राज बहाद्दूर , जिल्हाधिकारी राजवाडे , बाबासाहेबांचे सहकारी गोपालस्वामी अय्यंगार , हैदराबादचे मुख्य प्रधान एम. के. वेलोडी , हैदराबादचे अर्थमंत्री टी. व्ही.एस.राव , महसूलमंत्री शेषाद्री , शिक्षणमंत्री रामकृष्ण राव , हैद्राबाद शेड्युल कास्ट ट्रस्ट फंड चे सेक्रेटरी आबासे , पी.डब्ल्यू . डी. मंत्री नवाबजंग यावरजंग आदींनी मोलाचे सहकार्य केले होते . बाबासाहेबांनी या सर्वांचे आपल्या भाषणात आभार व्यक्त केले आहेत .

 (ads)

     बाबासाहेबांना मिलिंद महाविद्यालय हे केंब्रिज विद्यापीठाच्या धर्तीवर उभारायचे होते . केंब्रिज विद्यापीठ निसर्गरम्य जागेवर असून त्यात १०० पेक्षा अधिक ग्रंथालये आहेत . या ग्रंथालयांमध्ये लाखोच्या संख्येने पुस्तकांचा संग्रह आहे . ८ सांस्कृतिक , वैज्ञानिक संग्रहालये आहेत .हे विद्यापीठ तंत्रज्ञान , विज्ञान व संशोधन क्षेत्रात जगात अग्रेसर आहे . इथं व्याख्याने , सेमिनार सोबत साप्ताहिक लहान गट पर्यवेक्षण पद्धतीवर भर दिला जातो . अगदी याच पद्धतीचा अवलंब या महाविद्यालयात व्हावा म्हणून ते रात्र रात्रभर इथं थांबून कामावर निगराणी करत असत . त्यांनी या शहरात सुमारे २०६ एकर जागा मिळवली या संपूर्ण परिसरास त्यांनी ' नागसेन वन ' हे नाव दिले . 

(ads)

      पी. ई. सोसायटीने जागा खरेदी करण्या करिता हैद्राबाद संस्थानच्या ' शेड्युल कास्ट ट्रस्ट फंड ' मधून १२ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते . या ट्रस्ट करिता निजामाने १ कोटी रुपये मंजूर केले होते . सोसायटीला हे कर्ज बिनव्याजी मिळाले होते व १९५६ पासून दरवर्षी ५० हजार प्रमाणे परतफेड करायची होती . कॉलेज इमारत उभारण्यास एकूण खर्च २० लाख रुपये एवढा होता . यात मोठ्या वर्गखोल्या , प्रशस्त व हवेशीर प्रयोगशाळा , सुसज्ज क्रीडा संकुल , व्यायाम शाळा , अजिंठा बॉईज हॉस्टेल , प्रज्ञा गर्ल्स हॉस्टेल , भव्य ग्रंथालय आदींचा सहभाग होता. मिलिंद महाविद्यालयाचा परिसर ५४ एकरचा आहे . सुरवातीस हे महाविद्यालय फक्त कला महाविद्यालय होते . १९६० मध्ये वाणिज्य व १९६३ मध्ये विज्ञान विभाग सुरू करण्यात आले .

 (ads)

  औरंगाबादला बाबासाहेबांनी कॉलेज सुरू केले तेंव्हा त्यांना अनेकांनी तसे न करण्याविषयी सांगितले . मात्र बाबासाहेब त्यांच्या मतावर ठाम होते . त्यांनी औरंगाबाद येथे कॉलेज सुरू करण्याची कारणं आपल्या भाषणात सांगितली . ते म्हणाले की , शिक्षणाच्या बाबतीत हैद्राबाद संस्थान खूपच मागासलेले आहे . १९४९ मध्ये संपूर्ण संस्थानात केवळ १७ कॉलेजेस होती . या सर्व कॉलेजेसमध्ये केवळ ७६१५ विद्यार्थी होते . या १७ कॉलेजेस पैकी १४ कॉलेजेस एकट्या हैद्राबाद शहरात होती . इंटर पर्यंत शिक्षण देणारे फक्त १ कॉलेज ४५ लाख मराठी लोकवस्ती असलेल्या भागात आहे . यापेक्षाही अधिक खेदजनक बाब म्हणजे या संस्थानात शैक्षणिक सवलतींची असमाधानकारक व असमर्थनीय विभागणी होय . आम्हाला देशभर मुख्यत्वे मागासलेल्या वर्गात उच्य शिक्षणाचा प्रसार करायचा आहे .असे असले तरी या महाविद्यालयात सर्व जाती धर्माची मुलं, मुली आज शिक्षण घेत आहेत . आजमितीस एकूण ३३२ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यात केवळ २६ विद्यार्थी ( मुलं , मुली ) अस्पृश्य समाजाची आहेत . या मराठी भागाचा शैक्षणिक विकास या माध्यमातून होणार आहे . 

 (ads)

   राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबांच्या कार्याचे कौतुक करून शिक्षणाचे महत्व विषद केले . 

    या महाविद्यालयातून प्रत्येक विद्यार्थी ' मिलिंद ' व प्रत्येक शिक्षक ' नागसेन ' व्हावा अशी इश्चा बाबासाहेबांनी बोलून दाखविली आहे . ( इ. स.पूर्व १६० मध्ये भारतात मिलिंद राजा होता , त्याला वादविवाद करण्याची सवय होती . त्याने बौद्ध भिक्खु नागसेन यांचे समवेत वादविवाद केला तेंव्हा नागसेन यांनी अत्यंत संयमाने तत्त्वज्ञान व नैतिकता समजून सांगितली तेंव्हा राजा मिलिंद याने भिक्खु नागसेन यांच्या समोर आपला पराभव मान्य करून बौद्ध धर्म स्वीकारला. ) म्हणून बाबासाहेबांनी या परिसराचे नाव नागसेन तर कॉलेज चे नाव मिलिंद ठेवले आहे .

   (ads)

     या ७५ वर्षात या महाविद्यालयाने बरीच प्रगती केली आहे . या कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद ची मान्यता मिळालेली आहे . फेब्रुवारी २०२३ मध्ये यास मूल्यांकन चक्र २ , ग्रेड बी + मिळाले आहे . इथं पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेता येते . इथं ग्रंथालय , सभागृह , कॅफेटेरीया , वायफाय , व्यायामशाळा , प्रयोगशाळा , क्रीडांगण , मुला - मुलींचे स्वतंत्र वसतिगृह , अतिथी कक्ष , वर्गखोल्या , पार्किंग , वैद्यकीय सेवा कक्ष अश्या पायाभूत सुविधा आहेत . उच्यशिक्षित प्राध्यापक वर्ग व कार्यक्षम कर्मचारी वर्ग सेवारत आहे . ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने १५१ कोटी रुपये खर्चाची विविध कामं करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन समितीने तयार केला असून लवकरच त्यास मूर्तरूप येणार आहे .

       मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रातील ' मुकुटमणी ' असलेल्या या मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी समारंभाला झालेली ७५ वर्षे व या महाविद्यालयाने केलेली प्रगती लक्षणीय आहे . हा शैक्षणिक वारसा आजच्या बुडू पाहणाऱ्या शिक्षण व्यवस्थेला ललामभूत ठरेल याची खात्री आहे .



लेखक ..... जयसिंग वाघ 

अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक, जळगाव 

संपर्क .... ९८८१९२८८८१

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!