यावल (सुरेश पाटील)
यावल शहरातील ओला व सुका घनकचरा संकलन व वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या चार दिवसांपासून अनेक भागांमध्ये कचरा संकलनाची गाडी नियमित न आल्याने नागरिकांच्या घरांमध्येच ओला व सुका कचरा साचून राहिला आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
(ads)
शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर वेळोवेळी प्रसिद्धी व फोटोसेशन करणारे सत्ताधारी आणि विरोधक आता या गंभीर समस्येकडे का दुर्लक्ष करीत आहेत ? दुर्गंधी येत नसल्याने त्यांची नाके बधीर झाली आहेत का ? अशी उपरोधिक चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
(ads)
मुख्याधिकारी निष्क्रिय असल्याचा नागरिकांचा आरोप
कचरा संकलन व वाहतुकीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराकडून नियमित सेवा दिली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नगरसेवकही गप्प का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
(ads)
ठेकेदाराकडून कचरा संकलन व वाहतूक अनियमित होत असल्याच्या तक्रारी असताना ठेकेदाराची बिले पूर्णपणे अदा केली जातात का ? सेवा प्रत्यक्षात किती दिवस आणि किती प्रमाणात देण्यात आली, याची तपासणी केली जाते का ? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
(ads)
‘माऊली’चा यंत्रणेवर प्रभाव?
कचरा संकलनाच्या ठेकेदारीशी संबंधित ‘माऊली’ नामक व्यक्तीचा नगरपरिषद यंत्रणेवर प्रभाव व दबाव असल्याची चर्चा शहरात आहे.या चर्चेत तथ्य किती,हे प्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे.जर ठेकेदार किंवा संबंधित व्यक्तीकडून नगरपरिषदेच्या अटी-शर्ती, करारातील नियम अथवा घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे उल्लंघन होत असेल, तर त्यावर नियमानुसार कारवाई का होत नाही.? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नको
कचरा अनेक दिवस घरांमध्ये साचल्याने दुर्गंधी, माशा-मच्छर आणि रोगराईचा धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने तातडीने शहरातील कचरा उचलण्याची व्यवस्था ( पर्यायी व्यवस्था करून ) सुरळीत करावी.
(ads)
तसेच कचरा संकलनाच्या करारातील अटी-शर्ती, ठेकेदाराची दैनंदिन कामगिरी, कचरा संकलनाच्या फेऱ्यांची नोंद,वाहनांची जीपीएस / हजेरी नोंद आणि अदा करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
(ads)
चार दिवस घरात कचरा साचल्यानंतरही प्रशासनाला जाग येणार नसेल, तर यावलकरांनी आपल्या आरोग्याच्या प्रश्नासाठी दाद मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न सध्या यावल शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.


