रावेर,यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील ब्लॉक CSC केंद्रांमुळे नागरिक त्रस्त; जळगाव जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 CSC केंद्रांच्या अडचणींकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याची मागणी

यावल /रावेर  (सुरेश पाटील) —रावेर, यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात काही CSC (Common Service Centre) केंद्रे ब्लॉक अथवा निष्क्रिय अवस्थेत असल्याने केंद्र चालकांसह नागरिकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. या समस्यांबाबत संबंधित CSC जळगाव जिल्हा समन्वयकांशी दूरध्वनीद्वारे वारंवार संपर्क साधूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची ऑनलाइन तक्रार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.


याबाबत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे तहसीलदार, यावल यांच्यामार्फत निवेदन सादर करून CSC केंद्र चालकांच्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.


CSC केंद्रे निष्क्रिय असल्याने नागरिकांची गैरसोय 

रावेर, यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात काही CSC केंद्रे सध्या ब्लॉक अथवा निष्क्रिय असल्याने नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या विविध शासकीय व नागरिकाभिमुख डिजिटल सेवांवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः Farmer ID, Ayushman Bharat यासह अन्य महत्त्वाच्या सेवांबाबत केंद्र चालकांना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्र ब्लॉक झाल्यानंतर ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया करावी कोणत्या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा आणि आवश्यक कागदपत्रे अथवा तांत्रिक कार्यवाही कोणत्या पद्धतीने करावी, याबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळत नसल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

फोन करूनही प्रतिसाद नाही ?

सदर समस्यांबाबत संबंधित CSC जिल्हा समन्वयकांशी अनेकदा दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने केंद्र चालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्यांच्या प्रलंबित समस्या अधिकच वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होत नसल्यामुळे तांत्रिक अडचणींचे निराकरण वेळेत होत नाही. परिणामी,केंद्र चालकांना सेवा देताना अडथळे निर्माण होऊन त्याचा थेट परिणाम नागरिकांवर होत असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाने ठोस यंत्रणा उभारण्याची मागणी

CSC केंद्रे ही शासनाच्या विविध डिजिटल व नागरिकाभिमुख सेवा ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे केंद्र चालकांना तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणी उद्भवल्यास त्यांचे तातडीने निराकरण होणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित CSC जिल्हा समन्वयकांना केंद्र चालकांच्या तक्रारींना प्रतिसाद देण्याबाबत आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच रावेर, यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात निष्क्रिय CSC केंद्रांची तपासणी करून पात्र केंद्रे तातडीने कार्यान्वित करावीत, केंद्र चालकांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे आणि भविष्यात अशा समस्या उद्भवल्यास तक्रार निवारणासाठी जबाबदार अधिकारी / समन्वयकाचा अधिकृत संपर्क क्रमांक व कार्यपद्धती उपलब्ध करून द्यावी,अशीही मागणी करण्यात आली आहे.


नागरकांच्या सेवांवर परिणाम होऊ नये 

CSC केंद्रांमार्फत नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळत असल्याने केंद्रांच्या तांत्रिक अडचणींचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर होऊ शकतो. त्यामुळे केवळ केंद्र चालकांच्या समस्येपुरता हा विषय मर्यादित न राहता नागरिकांना वेळेत शासकीय सेवा मिळण्याशी संबंधित महत्त्वाचा प्रशासकीय प्रश्न म्हणून त्याकडे पाहण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे जळगाव जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ब्लॉक असलेल्या CSC केंद्रांचा आढावा, तांत्रिक अडचणींचे निराकरण,केंद्र चालकांशी नियमित संपर्क व्यवस्था आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी ऑनलाइन दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!