नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बना : प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

ऐनपूर : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या केसीआयआयएल व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवतंत्रज्ञान  कौशल्य अभियान कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य श्री. दिनेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून केसीआयआयएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे, केसीआयआयएलच्या कार्यक्रम समन्वयक कु. रश्मी जैन तसेच हेअरएक्सचे संचालक श्री. कौशल शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे केडीआयआयएल समन्वयक डॉ. डी. बी. पाटील यांनी कार्यशाळेची प्रस्तावना केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

उद्घाटनपर भाषणात श्री. दिनेश चव्हाण यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित करण्याची मोठी क्षमता असून, विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून उद्योजक बनावे, असे आवाहन केले.

मार्गदर्शन करताना केसीआयआयएलचे संचालक डॉ. नवीन खंडारे यांनी विविध यशस्वी उद्योजकांची उदाहरणे देत उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती दिली. विद्यार्थ्यांना उद्योग सुरू करताना कोणत्याही अडचणी आल्यास केसीआयआयएलच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कु. रोशनी जैन यांनी केसीआयआयएलचे कार्य, विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध सुविधा तसेच उद्योजकतेसाठी मिळणारे मार्गदर्शन व सहकार्य याबाबत सविस्तर माहिती दिली.

हेअरएक्सचे संचालक श्री. कौशल शिंदे यांनी स्वतःच्या उद्योगप्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. उद्योग सुरू करताना आलेल्या विविध अडचणी आणि त्यावर केलेल्या उपाययोजनांची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे येण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी जगातील विविध यशस्वी उद्योजकांनी अत्यंत साध्या कल्पनेतून आपल्या उद्योगाची सुरुवात कशी केली, याची उदाहरणे दिली. “विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळविण्याचा विचार न करता नोकरी देणारे उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवावे,” असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांना योग्य दिशा देण्यासाठी केसीआयआयएलशी संपर्क साधावा आणि उपलब्ध मार्गदर्शनाचा लाभ घेऊन उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे यावे, असेही डॉ. अंजने यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हेमंत बाविस्कर यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांनी मानले. कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबींसाठी डॉ. जे. पी. नेहेते व डॉ. एस. एस. साळुंखे यांनी सहकार्य केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी श्री. हर्षल पाटील, श्री. श्रेयस पाटील व श्री. अनुराग पाटील यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!