रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय बौद्ध महासभा जळगाव ( पुर्व ) जिल्हा शाखेच्या अंतर्गत, रावेर तालुका शाखेच्या वतीने पवित्र वर्षावासानिमित्त आयोजित करण्यात आलेला विशेष धम्म देशना व व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच रावेर तालुक्यातील कर्जोद येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्य विषय म्हणून 'माता रमाईंचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व' यावर संस्कार विभागाचे उपाध्यक्ष सदाशिव निकम गुरुजी यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
वर्षावासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण आणि पंचशील ग्रहणाने झाली. उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम अटकाळे गुरुजी यांनी वर्षावासाचे महत्त्व सांगत, मानवी जीवनात धम्माचे आचरण किती आवश्यक आहे यावर मोलाची धम्म देशना दिली.
माता रमाईंच्या विचारांना उजाळा
कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात संस्कार विभागाच्या वतीने 'माता रमाईंचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व' या विषयावर मुख्य व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संस्कर विभागाचे सचिव युवराज तायडे गुरुजी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, "त्याग, संयम आणि धैर्याचे दुसरे नाव म्हणजेच माता रमाई (त्यागवंती रमाई) होय. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करतांना महेंद्र वानखेडे (तालुका कोषाध्यक्ष) त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक लढ्यात माता रमाईंनी सावलीसारखी साथ दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कुटुंब आणि समाज टिकवून ठेवण्यासाठी जे कष्ट उपसले, ते आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत." माता रमाईंच्या अथांग कारुण्याची आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची विविध उदाहरणे देऊन उपस्थितांचे डोळे ओलावले.
संस्कार विभागाच्या माध्यमातून समाजातील बालकांवर, युवकांवर आणि महिलांवर चांगले संस्कार घडवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. माता रमाईंचे विचार केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता, ते प्रत्येकाने आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अमलात आणले पाहिजेत, असा सूर या व्याख्यानातून उमटला. संरक्षण विभागाचे सचिव महेंद्र तायडे यांनी संबोधीत करतांना बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित समाज निर्माण करणे हे प्रत्येक भीम सैनिकाचे आद्य कर्तव्य आहे. सामाजिक सुरक्षेसाठी समाजावरील अन्याय-अत्याचारा विरोधात आणि शोषणा विरुद्ध कायदेशीर व घटनात्मक मार्गाने खंबीरपणे उभे राहण्यासाठी शिस्त आणि नेतृत्त्व गुणांसाठी शारीरिक तंदुरुस्ती सोबतच बौद्धिक, वैचारिक आणि नेतृत्त्व गुणांचा विकास करण्यासाठी वैचारिक सैनिकांची गरज निर्माण झाली आहे. याच उदात्त हेतूने समता सैनिक दलाच्या वतीने "गाव तिथे शाखा – घर तिथे सैनिक" हे भव्य अभियान राबवले जात आहे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास तालुका संघटक आद. आकाश ठाकणे तथा मनोहर ससाणे यांनी उपस्थिती देवून कार्यक्रमाची शोभा वाढवली कर्जोद येथिल उपासकांनी कार्यक्रमाची तयारी अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने केली होती सवाद्य ढोल ताशाच्या गजरात तालुका पदाधिकारी यांचे स्वागत करून उत्तम असे भोजन ही दिले.



