ऐनपूर : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात ऋतुमती अभियानांतर्गत माऊली हॉस्पिटल, रावेर येथील डॉ. योगिता पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांनी महिला आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले. भारतीय कुटुंबव्यवस्थेत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, महिलांचे आरोग्य चांगले राहणे हे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याच उद्देशाने महाविद्यालयात महिला आरोग्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्त्या डॉ. योगिता पाटील यांनी ऋतुमती काळात महिलांनी आपल्या शरीराची योग्य प्रकारे काळजी कशी घ्यावी, आहार कसा असावा, स्वच्छतेचे महत्त्व तसेच मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या काळात योग्य आहार, पुरेशी विश्रांती, स्वच्छता आणि सकारात्मक मानसिकता यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने म्हणाले, “महिलांचे आरोग्य सुदृढ असेल तर घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ऋतुमती काळ हा महिलांच्या जीवनातील अत्यंत नाजूक व महत्त्वाचा काळ असून, या काळात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हेमंत बाविस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जे. पी. नेहेते यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव, प्रा. हर्षा महाजन, प्रा. कोमल सुतार, प्रा. धनश्री, प्रा. चैताली तसेच श्रेयस महाजन, हर्षल पाटील व अनिकेत पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यशाळेनंतर डॉ. योगिता पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे निरसन केले व आवश्यक मार्गदर्शन केले.


