रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा):
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी दारू व हातभट्ट्यांविरोधात एकाच वेळी विशेष शोध मोहीम राबवण्यात आली. या धडक कारवाईत पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून सुमारे ८१ हजार रुपये किमतीची गावठी दारू, कच्चे-पक्के रसायन आणि साहित्य ताब्यात घेऊन घटनास्थळीच नष्ट केले.
विविध ठिकाणी एकाच वेळी छापे
रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी, बीट अंमलदार आणि गुन्हे शोध पथकाची (DB Team) विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी कुसंबा, ताडजिन्सी, मोरव्हाल, गंगापुरी धरणाचा काठ, पाडला, पाडला खुर्द आणि नेहता परिसरात एकाच वेळी धाडसत्र राबवले.
कारवाईचा सविस्तर तपशील:
* कुसंबा शिवार: येथे टाकलेल्या छाप्यात २० लिटर हातभट्टीची दारू, १०० लिटर कच्चे रसायन आणि १५० लिटर पक्के रसायन जप्त करण्यात आले. ही हातभट्टी दीपक सुरेश भालेराव (वय ४२, रा. कुसंबा) चालवत असल्याचे निष्पन्न झाले.
* केंव्हाळा बीट व पाडला परिसर: गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून केंव्हाळा गावाजवळ दोन हातभट्ट्यांवर धाड टाकून २८० लिटर गावठी दारू आणि ५५ लिटर उकळते रसायन जागीच नष्ट करण्यात आले. या भट्ट्या बिस्मिला चांदखाँ तडवी आणि असलम हसन तडवी (दोघे रा. पाडला) चालवत होते.
* पाल आणि अजंदा परिसर: पाल येथून कृष्णा मधुकर राठोड (रा. पाल) याच्या ताब्यातून १५ लिटर दारू जप्त करण्यात आली. तर अजंदा येथे सुपडू भिवसन तायडे (रा. नेहता) याच्याकडून ३० लिटर दारू व १०० लिटर कच्चे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले.
सर्व आरोपींवर गुन्हे दाखल
या कारवाईत जप्त करण्यात आलेला एकूण ८१,००० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जागीच उद्ध्वस्त केला आहे. सर्व संबंधित आरोपींविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अवैध धंद्यांविरोधात अशी कारवाई पुढेही सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
मार्गदर्शन व पथक:
ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित (जळगाव परिमंडळ) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संदीप पाटील, स.पो.नि. हरिदास बोचरे, स.पो.नि. अमोल बच्छाव, पो.उप.नि. मनोज महाजन, पो.हे.कॉ. विजय चौधरी, ईश्वर चव्हाण, योगेश महाजन तसेच गुन्हे शोध पथकातील समाधान ठाकूर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, तुषार मोरे, योगेश पाटील, कुंदन नागमल व शुभम काळे यांनी पार पाडली.


