रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : शेतातून चोरी जाणाऱ्या मोटारपंप व कॉपर वायरच्या घटनांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला रावेर पोलिसांना यश आले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मोटारपंप चोरीप्रकरणी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, चोरीस गेलेला विद्युत मोटारपंपही हस्तगत केला आहे.
रमजीपूर येथील शेतकरी मोहन लालचंद कावडकर यांच्या शेत गट क्रमांक १६२२/२ मधून दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी ५ एच.पी. क्षमतेची समुराई कंपनीची पाण्याची मोटार चोरून नेली होती. याप्रकरणी दि. ६ ऑक्टोबर रोजी रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ०४४४/२०२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : दुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक
शेतातील मोटारपंप व कॉपर वायर चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, बिट अंमलदार तसेच गुन्हे शोध पथकाची विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांना गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
हेही बातमी वाचा : Chinawal Crime News : रावेर तालुक्यातील चिनावल येथील २७ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविले
तपासादरम्यान रावेर गुन्हे शोध पथक व बिट अंमलदारांना चोरीस गेलेली मोटार रमजीपूर गावात विक्रीसाठी आणली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत राजेंद्र सुधाकर महाजन (वय ३०), उमेश प्रकाश धनगर (वय २३), रितेश जगन्नाथ कावडकर (वय २३) आणि आनंदा गोपाळ धनगर (वय २८), सर्व रा. रमजीपूर, ता. रावेर यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या माहितीवरून चोरीस गेलेला विद्युत मोटारपंप हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या मोटारपंप किंवा कॉपर वायर चोरीच्या घटना केल्या आहेत का, या गुन्ह्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि चोरीचा माल कुठे विकण्यात आला आहे, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
जुनी मोटार, कॉपर वायर खरेदी-विक्री करणाऱ्यांची माहिती द्या - रावेर पोलिसांचे आवाहन
रावेर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, रावेर शहर व परिसरात जुनी मोटार, कॉपर वायर अथवा विद्युत पंप विक्री किंवा खरेदी करणाऱ्या संशयास्पद व्यक्तींबाबत माहिती असल्यास ती तातडीने रावेर पोलीस स्टेशन अथवा पोलीस निरीक्षकांकडे द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
पथकाचे कौतुक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ श्री. संदीप गावीत तसेच फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमुल बच्छाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील तसेच रावेर गुन्हे शोध पथकातील श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी आणि विकार शेख यांनी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास बिट अंमलदार सिकंदर तडवी करीत आहेत.


