गुटखा, सुगंधी तंबाखू व इलेक्ट्रिक स्कूटीसह १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त
जळगाव जिल्हा प्रतिनिधी | नितीन इंगळे
जामनेर : तालुक्यातील चिंचोलीपिंप्री परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या प्रसाद दामू वाणी याला फत्तेपूर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री हिंगणे फाट्याजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी गुटखा, सुगंधी तंबाखू आणि इलेक्ट्रिक स्कूटी असा एकूण १ लाख ७ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
(ads)
हिंगणे फाट्याजवळ पोलिसांची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास फत्तेपूर-कसबापिंप्री रस्त्यावरील हिंगणे फाट्याजवळ प्रसाद दामू वाणी हा इलेक्ट्रिक स्कूटीवरून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक करताना आढळून आला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत संबंधित मुद्देमाल जप्त केला.
एक लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुढील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
- विमल गुटखा : २९ हजार रुपये
- सुगंधी तंबाखू : ७ हजार २६० रुपये
- इलेक्ट्रिक स्कूटी : ७० हजार रुपये
अशा प्रकारे एकूण १ लाख ७ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिम्मतराव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
(ads)
फत्तेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात फत्तेपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.



