यावल ( सुरेश पाटील) यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारा विना क्रमांकाचा पिवळ्या रंगाचा डंपर महसूल पथकाने आज दिनांक 15/10/2026 रोजी पकडून तहसील कार्यालय यावल येथे जमा केला आहे.या कारवाईमुळे तालुक्यात सर्रासपणे धावणाऱ्या बिना नंबरच्या आणि मुदत संपलेल्या वाहनांच्या प्रश्नावर पुन्हा प्रकाश टाकला गेला आहे.
महसूल पथकाने केलेल्या पंचनाम्यातील माहितीनुसार आज दि. 15/10/2026 रोजी सकाळी 6.30 वाजता मौजे भालोद ते डोंगर कठोरा रस्त्यावर महसूल पथकाला गस्ती दरम्यान पिवळ्या रंगाचा,चेसिस नंबर असलेला, विना क्रमांकाचा डंपर गौण खनिज (वाळू) वाहतूक करताना आढळून आला.
पथकाने सदर डंपरचा पाठलाग केला असता सकाळी 7.00 वाजता फैजपूर - सावदा रोड येथे तो पकडण्यात आला. तपासणी केली असता डंपर मध्ये अंदाजे 2 ब्रास वाळू आढळून आली.चालक गाडी थांबवताच गाडीवरून उतरून पळून गेल्याने चालकाचे आणि मालकाचे नाव पंचनाम्यात नमूद करता आले नाही.
त्यानंतर सदर गाडी आजच सकाळी 8.00 वाजता यावल येथील नवीन प्रशासकीय इमारत / तहसील कार्यालय येथे लावण्यात आली.ही कारवाई नायगाव येथील तलाठी, फैजपूर-1, बोरखेडा मंडळ आणि साकळी, किनगाव, सावखेडा,भालोद वामणोद तसेच ग्रुपच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.
कायद्याच्या दृष्टीकोनातून हे गंभीर का आहे ? -
यावल तालुक्यात सध्या अनेक बिना नंबर प्लेटची,तसेच कागदपत्रांची मुदत संपलेली वाहने भरधाव वेगाने धावत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन:
मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 39 नुसार नोंदणी (Registration) न केलेले वाहन सार्वजनिक रस्त्यावर चालवता येत नाही.कलम 50 नुसार नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे.बिना नंबरचे वाहन चालवणे हा दंडनीय अपराध असून पहिल्या गुन्ह्यासाठी 5000 रुपये पर्यंत दंड आणि पुढील गुन्ह्यासाठी 10,000 रुपये पर्यंत दंडाची तरतूद आहे.
अवैध गौण खनिज वाहतूक:
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि खान व खनिज (विकास व नियमन) अधिनियम 1957 चे कलम 21 अन्वये विना परवाना वाळूचे उत्खनन व वाहतूक हा गंभीर गुन्हा आहे. यात वाहन जप्ती आणि दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न:
बिना क्रमांकाच्या वाहनाचा अपघात झाल्यास वाहनाचा शोध घेणे कठीण होते.विमा (Insurance), फिटनेस, PUC नसल्यास अपघातग्रस्ताला नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येतात.ही वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
जबाबदारी कोणाची ? - नागरिकांचा सवाल
या बेकायदा वाहतुकीला आळा घालण्याची जबाबदारी महसूल विभागासोबतच पोलीस विभाग आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ( RTO ) यांचीही आहे.यावल तालुक्यात अशा वाहनांवर नियमित तपासणी मोहीम राबवली जाते का ? या वाहनांना कोणाचे अप्रत्यक्ष सहकार्य मिळते का ? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.मात्र कोणत्याही यंत्रणेवर थेट आरोप करण्यापेक्षा संयुक्त कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडून अपेक्षा--
महसूल,पोलीस आणि RTO विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून बिना नंबर आणि मुदत संपलेल्या डंपर,ट्रॅक्टरवर कारवाई करावी.वाळू वाहतुकीसाठी लागणारे ई-टीपी (e-TP) आणि रॉयल्टी पावती तपासणी कडक करावी. नागरिकांनी अशा वाहनांचे फोटो / व्हिडिओ काढून 112 किंवा स्थानिक तहसील कार्यालयाला कळवावे.
महसूल पथकाने आज केलेली ही कारवाई स्वागतार्ह असली तरी ही एकच कारवाई पुरेशी नाही, तर अशा बेकायदेशीर वाहतुकीवर कायमस्वरूपी अंकुश लावण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी यावल तालुक्यातील जनतेतून होत आहे.
बिना क्रमांकाचे वाळू वाहतुकीचे डंपर मंडळ अधिकारी किनगाव - सलमान तडवी,मंडळ अधिकारी भालोद - सुरवाडे भाऊसाहेब मंडळ अधिकारी बामनोद -दिपक गवई मंडळ अधिकारी सावखेडा सिम - शीतल पवार मंडळ अधिकारी साकळी - रिद्धी निघोट ग्राम महसूल अधिकारी - ईश्वर कोळी, वसीम तडवी,मिलिंद कुरकुरे, एन. आर. चौधरी, निशांत मोहोळ ,संदीप गोसावी, शरीफ तडवी, राजू गोरटे, विजयसिंह पाटील, अमित राऊत,सुनील कुंभार. श्रीकांत केंद्रे.रेखा जोरवार यांनी केली.



