रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील नवोदय विद्यालय, अक्कलकुवा येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी निरागिका कोळी हिच्या वसतिगृहातील संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात रावेर तहसीलदार संजय तायडे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील सत्य समोर आणण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच संबंधित दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.
संघर्ष समितीने शिक्षण संस्थांमध्ये आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष पोलीस यंत्रणा नियुक्त करावी, तसेच शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनावर संघर्ष समितीचे पदाधिकारी व समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या असून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
यावेळी संघटनेची तालुकाध्यक्ष दत्तात्रय तायडे कार्याध्यक्ष दीपक तळले उत्सव कमिटी अध्यक्ष विनोद कोळी योगेश्वर कोळी मनोहर कोळी गणेश कोळी भूषण तायडे नितीन कोळी अतुल कोळी शामराव कोळी विजय मानेकर प्रवीण कोळी प्रदीप रायमळे किरण कोळी विजय अवसरमल विनोद तायडे मयूर कोळी सुपडू मोरे विनोद कोळी शुभम कोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते


