संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची गडचिरोलीला बदली करा; पत्रकाराची जाहीर माफी मागावी – डॉ. विश्वासराव आरोटे यांची आक्रमक मागणी; अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा!
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दिवसेंदिवस हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून, आता पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राजकीय व्यक्तींकडून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांनंतर आता पोलीस यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांकडूनही पत्रकारांना मारहाण होण्याच्या घटना समोर येत असल्याने लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई येथील महिला पत्रकार प्रिया खंडागळे यांच्याशी संबंधित मारहाणीच्या कथित घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची तातडीने गडचिरोली येथे बदली करावी, पत्रकाराची जाहीर माफी मागावी आणि गृह विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.
(ads)
यावेळी बोलताना डॉ. आरोटे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या थोर पत्रकारांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासनदरबारी मांडण्याची परंपरा निर्माण केली. पत्रकारिता ही कोणाचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी नसून समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. त्यामुळे पत्रकार हा समाज आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. पोलीस, वकील आणि पत्रकार ही लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाची क्षेत्रे असून, या तिन्ही घटकांबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात आदर आहे. पोलीस आणि पत्रकार हे समाजहितासाठी एकमेकांना पूरक आहेत. अनेक गुन्ह्यांच्या तपासात पत्रकारितेतून समोर येणाऱ्या माहितीचा पोलिसांनाही उपयोग होतो. मात्र, अशा परिस्थितीत पत्रकारांनाच मारहाण केली जात असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.
(ads)
नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यांच्या व्यवसायाबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीवरून पत्रकार प्रिया खंडागळे यांनी वृत्त प्रसिद्ध केले होते. संबंधित परिसराची बदनामी होऊ नये आणि तेथील अवैध व्यवसाय बंद व्हावेत, अशी स्थानिक नागरिकांची भूमिका असल्याचे या वृत्तातून मांडण्यात आले होते. मात्र, या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याकडून पत्रकार तरुणीला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पत्रकाराने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताबाबत आक्षेप असल्यास कायदेशीर मार्गाने आपली बाजू मांडता आली असती; परंतु मारहाण करणे हा कोणत्याही परिस्थितीत पर्याय होऊ शकत नाही, असे डॉ. आरोटे यांनी स्पष्ट केले.
(ads)
पत्रकार असल्याचे माहीत असूनही मारहाण करणे आणि त्यानंतर माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणे, हा प्रकार थांबला पाहिजे. आधी मारहाण करायची आणि नंतर माफी मागायची, असा प्रकार लोकशाहीत खपवून घेतला जाणार नाही. दिल्लीतील आंदोलनादरम्यानही महिला पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. आता महाराष्ट्रातही अशा घटना घडत असतील तर पत्रकारांनी निर्भयपणे काम कसे करायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
(ads)
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची तातडीने गडचिरोली येथे बदली करावी, तिच्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी आणि पत्रकार प्रिया खंडागळे यांची जाहीर माफी मागण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. आरोटे यांनी केली. यासंदर्भात राज्य पत्रकार संघाच्या वतीने गृह विभागाकडे निवेदन देण्यात आले असून, ठाणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस महासंचालक स्तरावरही या विषयाकडे लक्ष वेधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
(ads)
पत्रकारितेच्या माध्यमातून कुंटणखान्यांसारख्या अवैध व्यवसायांवर आवाज उठवला जात असेल तर अशा व्यवसायांवर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या व्यवसायांना कोणाचे राजकीय पाठबळ आहे का, त्यातून कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत का, याचीही चौकशी झाली पाहिजे. अवैध व्यवसायांकडे दुर्लक्ष करून त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर तो सहन केला जाणार नाही. पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी दादागिरी आणि मारहाणीचा मार्ग स्वीकारणे ही कायद्याच्या राज्याला शोभणारी बाब नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
(ads)
पत्रकार प्रिया खंडागळे या धाडसी महिला पत्रकार असून, त्यांनी समाजहिताचा विषय मांडल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे डॉ. आरोटे यांनी नमूद केले. पत्रकार कोणत्याही राजकीय पक्षाच्या आधारावर काम करत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, अन्याय, भ्रष्टाचार आणि समाजातील चुकीच्या प्रवृत्ती यांना वाचा फोडणे हेच पत्रकारांचे कर्तव्य आहे. पाकिट पत्रकारिता न करता दिवसभर आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणारे असंख्य पत्रकार राज्यात कार्यरत आहेत. अशा पत्रकारांना संरक्षण मिळण्याऐवजी त्यांच्यावर हल्ले होत असतील तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
(ads)
पत्रकारांच्या संयमाचा अंत पाहू नका!
पत्रकार प्रिया खंडागळे यांच्यावरील हल्ल्याच्या आरोपांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची बदली करून पत्रकाराची माफी मागण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दिला. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळातही जनतेच्या सुरक्षेसाठी आणि समाजहितासाठी काम करणाऱ्या पत्रकारांनाच रस्त्यावर उतरावे लागले तर ही प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरेल.
हेही बातमी वाचा: बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सरकारची मोठी घोषणा! शैक्षणिक साहित्याच्या ४९ वस्तूंचा संच मिळणार
पत्रकार पोलिसांना सहकार्य करतात; मात्र पत्रकारांच्या सन्मानाचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास तेही अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरतील. पत्रकारितेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, कारण हा आवाज कोण्या एका व्यक्तीचा नसून सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांचा आहे, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.



