यावल शहरात बंद घरात चोर असल्याची अफवा; हजारो नागरिकांचा जनसमुदाय जमल्याने खळबळ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील)

धनतेरसच्या पूर्वसंध्येला (गुरुवार, दि. ५ रोजी) रात्री १० वाजेच्या सुमारास यावल शहरात एका बंद घरात चोर असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. या अफवेमुळे सुदर्शन चित्र मंदिर परिसरातील बडगुजर यांच्या घराजवळ तब्बल एक ते दीड हजार नागरिकांचा मोठा जनसमुदाय जमा झाला होता. परिस्थितीची गंभीर दखल घेत पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली, मात्र अफवेमुळे जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे पोलिसांना देखील नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. शेवटी घरात बघितली असता काहीही आढळून आलेले नाही. 

(ads)

घटना नेमकी काय?

गुरुवारी रात्रीच्या सुमारास यावल शहरातील सुदर्शन चित्र मंदिराजवळ एका बंद घरात चोर शिरल्याची चर्चा परिसरात सुरू झाली.ही अफवा संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने अल्पावधीतच त्याठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. या अनपेक्षित आणि बेकायदेशीर गर्दीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. 

 (ads)

कायद्याच्या धाकावर प्रश्नचिन्ह?

या प्रकारामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. अफवांवर विश्वास ठेवून एकाएकी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याने प्रशासकीय यंत्रणेसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, या घटनेमुळे शहरात पोलिसांचा वचक आणि धाक राहिला आहे की नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.  

(ads)

जनहित आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन या प्रकरणी काय कठोर कारवाई करते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.