पालघर - जिल्ह्यामध्ये मान्सून कालावधीत मोठ्या संख्येने पर्यटक धबधबे, तलाव, धरणे व समुद्र किनारी येत असतात व त्याठिकाणी जिवीतहानी होण्याच्या घटना घडत असतात. सद्यस्थितीमध्ये पालघर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पावसाळ्यात पालघर जिल्ह्यामध्ये असलेले धबधबे, तलाव किंवा धरणे, समुद्र किनारे इत्यादि पर्यटन ठिकाणी मोठया प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी आल्याने त्या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होण्याची व सामाजिक अंतर राखले न गेल्यास तेथे कोविड- १९ चा संसर्ग व प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पालघर डॉ. माणिक गुरसळ, यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पालघर जिल्हयातील वसई तालुका वगळून उर्वरीत सात तालुक्यांचे क्षेत्रातील सर्व धबधबे, तलाव, धरणे, समुद्र किनारे या पर्यटन स्थळांच्या १ कि.मी. परीसरात दि.१२/०६/२०२१ ते दि.०९/०८/२०२१ या कालावधीमध्ये खालील बाबींकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहेत.
१) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.
२) धबधब्याच्या उगमः स्थानी जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
३) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कटडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.
४) पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.
५) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे.
६) वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतूकीस परिणाम होईल अशा प्रकारे वाहने चालविणे.
७) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.
८) सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे.
९) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
१०) सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डि. जे. सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पिकर / उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनी प्रदुषण करणे.
११) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.
सदरच्या मनाई आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुध्द भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ८ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१ (b) नुसार कारवाई करण्यात येईल.
