साप्ताहिक सुवर्ण दिप
हेडलाईन्स, 30 जुलै 2021
• हसरंगाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेचा भारतावर ७ विकेट्सने विजय; मालिकाही घातली खिशात
श्रीलंका विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी (२९ जुलै) आर प्रेमदासा स्टेडियमवर झाला. या सामन्यात श्रीलंकेने ७ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच ३ सामन्यांची ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
• अतिवृष्टीचा इशारा! | राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा
पुढील चार दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाण्यात आज तर मुंबईतील काही भागांत उद्यापासून अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
• महिलांसाठी 24 तास काम करणार ही राष्ट्रीय हेल्पलाईन, या क्रमांकावर नोंदवता येणार तक्रार
देशातील कोणतीही महिला आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल हेल्पलाईन क्रमांक 7827 170 170 वर फोन करून आपली तक्रार नोंदवू शकते. ही हेल्पलाईन 24 तास सुरू असेल. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांना वेळेवर माहिती आणि मदत पुरवली जाईल, असं राष्ट्रीय महिला आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या परिसरातून ही हेल्पलाईन चालवली जाणार असून तिला प्रशिक्षित विशेषज्ज्ञ मदत करणार आहेत. सल्ला देणार आहेत. 18 वर्षांची किंवा त्याहून जास्त वयाची तरुणी किंवा महिला या हेल्पलाईनला फोन करून सेवा घेऊ शकते. राष्ट्रीय महिला आयोग देशभरातून आलेल्या महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडितांना मदत करत आहे.
• धडाक्यात लग्न महागात, अखेर बार्शीतील आमदार पुत्रांवर गुन्हा दाखल
राज्यात कोरोना संकटाचा विळखा असताना सोलापुरात बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचं मोठ्या धुमधडाक्यात आणि थाटामाटात लग्न केलं होतं. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर पोलीस प्रशासन आक्रमक झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आमादारांची दोन्ही मुलं रणजित राऊत आणि रणवीर राऊत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी आधी आयोजक योगेश पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुद्द्यावरुन टीका झाल्यानंतर अखेर पोलिसांनी आमदारांच्या मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
• एसटी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतर हाल; तीन हजारांची पेन्शन
राज्य परिवहन महामंडळाने काटकसरीचे धोरण अवलंबित एसटीचा प्रवास कायम सुरू ठेवला आहे. खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न कमी असल्याने परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतनही अल्प प्रमाणात देते. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हातात पडणारी पेन्शनही अपुरीच असते. पूर्वी १२०० रुपये पेन्शन मिळत होती. आता तीन ते साडेतीन हजारांपर्यंत ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या हातात पडत आहे. मिळणारी पेन्शन आणि वाढती महागाई याच्यात कुठलाच ताळमेळ बसत नाही. यामुळे निवृत्तीनंतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक हाल होतात
• "मुली रात्रभर बीचवर फिरतात याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही"
गोव्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली. यावरून विरोधकांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. याला प्रमोद सावंत यांनी उत्तर देत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना अटक केली आहे. मात्र पालकांचीही जबाबदारी आहे. अल्पवयीन मुलांना रात्रभर बाहेर सोडता तेव्हा मुलांच्या सुरक्षेचीही जबाबदारी घ्या, असं प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. ते गोव्यात माध्यमांशी बोलत होते.
• Tokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप
भारतीय शटलर आणि जागतिक मानांकनात सहाव्या स्थानावर असलेली पी. व्ही. सिंधू टोकियो ऑलिंपिकमध्ये पदकाच्या दिशेने जोरदार वाटचाल करत आहे. सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश.
• नवीन मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्यास माजी मुख्यमंत्र्यांचा जाहीर नकार*
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलानंतर आता नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. असे असताना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास आधीच नकार कळवला आहे. मुख्यमंत्री आपल्याला ज्युनिअर असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
• पाकव्याप्त काश्मीरमधून सैन्य मागे घ्या, भारताने पाकिस्तानला बजावले
पीओके हा भारताच्या जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने या भागावर लष्करी बळाच्या जोरावर अतिक्रमण केले आहे. या भागात निवडणुकीचा देखावा उभा करून पाकिस्तान अतिक्रण लपवण्याचा बेकायदा प्रयत्न करत आहे, असे भारत सरकारच्यावतीने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले. लष्करी बळावर अतिक्रण करुन पाकिस्तानने मागील ७० पेक्षा जास्त वर्षांपासून पीओकेमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन चालवले आहे. पाकिस्तानने अतिक्रमण केलेला भूभाग मोकळा करावा, अशी मागणी भारताने केली.
• सरकारी यंत्रणेविरुद्ध भाष्य केल्याबद्दल चिनी उद्योगपतीला १८ वर्षांची कैद
सरकारवर टीका करणाऱ्या उद्योगपतींची गळचेपी चीनमधील कम्युनिस्ट सरकारने कायम ठेवली आहे. सरकारी यंत्रणेविरुद्ध परखड भाष्य केल्याबद्दल एका उद्योगपतीला चीनमध्ये १८ वर्षांची कैद ठोठावण्यात आली. सून दावू असे त्यांचे नाव असून चीनच्या नामवंत अब्जाधीश उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश आहे