केळी पिकावरील कुकुंबर मोसॅक व्हायरसचाप्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी...

अनामित
जळगाव - जिल्ह्यात केळी हे प्रमुख फळपिक असून सुमारे 45 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. कुकुंबर मोसॅक व्हायरस (CVM) हा केळी पिकावरील प्रमुख विषाणुजन्य रोग आहे. दरवर्षी माहे जुलै ते सप्टेंबर दरम्यान CVM रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन येतो. CVM रोगाचा प्रादुर्भाव रोखणे व नियंत्रण करण्यासाठी शेतक-यांनी पुढील काळजी घेण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.  
[ads id='ads1]
  सततचे ढगाळ वातावरण, जुन-जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडित पाऊस, प्रकाशाची तीव्रता कमी असणे व किमान तापमान 24-25 अंश से. असणे, जास्त आर्द्र हवामान, इत्यादी घटक CVM रोगास पोषक असतात. सुरुवातीस कोवळया पानांवर विरहित, पिवळसर पट्टे दिसणे, पानाचा पृष्ठभाग आकसला जाऊन व कडा वाकडया होऊन पानांचा आकार लहान होणे, पानाच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होणे, पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून पाने फाटणे, पोंग्याजवळील पान पिवळे पडून पोंगा सडणे, झाडांची वाढ खुंटणे, इत्यादी लक्षणे CVM रोगात आढळतात.

  CVM विषाणुचा प्राथमिक प्रादुर्भाव रोगट कंदापासून होतो तसेच या रोगाचा दुय्यम प्रसार प्रामुख्याने मावा किडीच्या माध्यमातुन होतो. CVM विषाणुची जवळ-जवळ 1 हजार यजमान पिके येतात. CVM रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय करता येत नाही. तथापी CVM रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटुन दुर ठिकाणी जाळुन किंवा गाडुन टाकावी. बागेची 2/3 वेळा चार ते पाच दिवसांनी नियमित निरिक्षण करुन रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही विल्हेवाट लावावी. बागेतील व बांधावरील मोठा केणा, छोटा केणा, धोतरा, काहे, रिंगणी, चिलघोल, शेंदाळे, गाजर गवत इत्यादी प्रकारची तणे काढुन बाग स्वच्छ ठेवावी, पिकाची फेरपालट करावी.
[ads id='ads2]
  केळीत काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगे, मिरची, मका या पिकाची लागवड करु नये, तसेच केळी बागेभोवती रान कारली, शेंदळी, कटुर्ले, गुळवेल यासारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत. मावा या वाहक किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथेएट 30 ई.सी. 20 मिली किंवा थायोमिथोक्झाम 25 डब्लु जी. 2 ग्राम किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 एस.एल. 5 मिली या किटकनाशकांची 10 लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                            

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!