ही रोपे आपण पुढील स्वातंत्र्यदिनी विविध गावांना नक्की देऊ शकू. यातून सात पिढ्यांसाठी ऑक्सिजनची निर्मिती होईल. शासनाच्या माध्यमातूनही जिल्हास्तरावर देशी व स्थानिक जातीच्या रोपवाटिका तयार केल्या जाव्यात, यासंदर्भातही मी मुख्यमंत्र्यांसह संबंधित खात्याच्या मंत्र्यांसमवेत सतत चर्चा करीत आहे, असे आवाहन देवराई प्रकल्पप्रमुख व हिंदी, मराठी, कन्नड व तमीळ चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते श्री.सयाजी शिंदे यांनी केले. [ads id="ads2"]
जळगाव शहर महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिरवाई’ या प्रकल्पांतर्गत आज शुक्रवार, दि.24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी साडेतीन वाजता मेहरुण तलाव परिसरात 1001 झाडे लावण्याच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. प्रख्यात कादंबरीकार श्री.रंगनाथ पठारे, ज्येष्ठ कवयित्री सुमती लांडे, कवी श्री.प्रकाश होळकर, महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्यासह मराठी प्रतिष्ठानचे सचिव ‘वनश्री’ विजयकुमार वाणी, अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, सदस्य डॉ. धनंजय बेंद्रे, श्री.लक्ष्मीकांत सूद, सुबोनियो केमिकल्स लि.चे श्री.सुबोध चौधरी, श्री.आनंदराव मराठे, सदस्या सौ.निलोफर देशपांडे, सौ.संध्या वाणी, डॉ.सुनीती बेंद्रे, डॉ.सविता नंदनवार, सौ.सुमित्रा पाटील, सौ.योगिता पाटील, श्री.चंद्रशेखर नेवे, श्री.विजय पाठक तसेच वृक्ष संवर्धन समितीच्या आरती शिंपी, पल्लवी शिंपी, महेश शिंपी, ज्येष्ठ रंगकर्मी श्री.शंभू पाटील, नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, सौ.दीपमाला काळे, आयकर विभागाचे उपायुक्त श्री.मकवाना, श्री.संजय शहा, ‘लिग्रँड’चे कर्मचारी यांच्यासह जळगावातील वृक्षप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरूवातीला सिनेअभिनेते श्री.सयाजी शिंदे यांचा ‘वनश्री’ विजयकुमार वाणी, श्री.रंगनाथ पठारे यांचा महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, सुमती लांडे यांचा निलोफर देशपांडे, श्री.प्रकाश होळकर यांचा अॅड.शुचिता हाडा व श्री.शंभू पाटील यांचा श्री.विजयकुमार वाणी यांनी रोपटे देऊन सत्कार केला. त्यानंतर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, अॅड.जमील देशपांडे व श्री.विजयकुमार वाणी यांनी जळगाव शहर महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्यात ‘हिरवाई’ प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड व संवर्धनासंदर्भात करार झालेला आहे. या प्रकल्पामुळे जळगाव शहराच्या सौंदर्यीकरणात निश्चितपणे भर पडेल. या अंतर्गत करंज, कडुनिंब, वड, पिंपळ, आवळा, चिंच, अमलतास, बहावा, कदंब आदी विविध जातींच्या रोपांचा समावेश आहे. या 1001 झाडांसाठी संपूर्णपणे खड्डे खोदून रोपट्याला काटेरी कुंपण टाकण्याचे कामही नियोजनपूर्वक सुरू झालेले आहे. ‘मराठी प्रतिष्ठान’च्या पुढाकाराने साकारला जाणारा हा सहावा प्रकल्प असल्याचे श्री.सयाजी शिंदे यांना सांगितले. श्री.शिंदे, श्री.पठारे, सुमती लांडे, श्री. होळकर, महापौर सौ.महाजन, श्री.शंभू पाटील यांनी यावेळी प्रत्येकी एका रोपाची लागवड केली. याचवेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांसमवेत हात जोडून ‘पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’चा घोष करून ‘आंब्याच्या नावानं चांगभलं’, ‘वडाच्या नावानं चांगभलं’ अशी प्रार्थनाही केली. त्यानंतर सिनेअभिनेते श्री.सयाजी शिंदे यांच्यासमवेत उपस्थितांनी छायाचित्रे काढली.
‘मराठी प्रतिष्ठान’ उभारणार ‘श्री.सयाजी शिंदे वृक्ष बँक’
दरम्यान, ‘मराठी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अॅड.जमील देशपांडे व सचिव ‘वनश्री’ विजयकुमार वाणी म्हणाले, की श्री.सुबोध चौधरी यांनी वृक्षलागवडीसाठी आरक्षित केलेल्या 21 एकर जागेत वटवृक्षांसह ‘बेलाच्या रोपांची श्री.सयाजी शिंदे वृक्ष बँक’ या नावाने आम्ही बँक साकारू. या कामाला उद्यापासूनच आम्ही सुरूवात करू. यातून तयार झालेली रोपे जळगाव जिल्ह्यातील विविध गावांत वाटप केली जातील, हे आम्ही आजच आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो. यासाठी काही मदत लागली, तर आपण नक्कीच सहकार्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.सयाजी शिंदे यांना आश्वस्त केले. त्यावर श्री.शिंदे यांनीही तुम्ही फक्त हाक द्या, पाहिजे ती मदत पुरविण्यासाठी मी बांधील असल्याची ग्वाही उपस्थितांसमोर दिली.