नाशिक ( प्रतिनिधी ) - खाजगी वादातून वसंत काशिराम टोपले यांच्या शेतातील उभा ऊस जाळून टाकण्यात आल्याची घटना रविवारी ( दि.१९) सायंकाळी घडली. ऊसाच्या पाचटाला संशयित पेटवत असतांना वसंत यांच्या पत्नी कलाबाई यांनी बघून आरडाओरडा केला. [ads id="ads1"]
संशयित आग लावून पळून गेले. २० गुंठे क्षेत्रावरील ऊस जाळल्याने टोपले कुटुंबीय हतबल झाले आहेत. त्यांनी सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद बागलाण तालुक्यातील सटाणा पोलीस ठाण्यात दिली आहे.[ads id="ads2"]
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, सटाणा तालुक्यातील पठावे दिगर येथे वसंत टोपले यांचे ४० गुंठे शेतात उसाचे पीक आहे. काढणीला आलेल्या उसाची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कापणी करण्यात येणार होती. शेजारी चुलते सुदाम गणपत टोपले यांचे शेत असून त्यांनी कांदा रोप लावला आहे. गट नं.६१ व६२ याचे सामायिक बांधावरून दोन महिन्यांपासून वाद सुरु होता.
यापूर्वी ही वसंत टोपले यांनी जमिनीच्या वादातून पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. रविवारी डोंगऱ्या देवाचा उत्सव असल्याने टोपले कुटुंबीय तेथे गेले होते. तेथून परततांना संध्याकाळी सौ. कलाबाई आपल्या शेताच्या बांधवरून जात असता त्यांनी संशयितास ऊसाच्या पाचटाला आग लावतांना बघितले. त्यांनी आरडाओरडा करताच संशयित पळून गेले.
यावेळी जोरदार वारा असल्याने ऊस भराभर पेटला व नुकसान झाले. घटना घडताच धाऊन आलेल्या वसंत, त्यांचा मुलगा अमोल, शेजारी राजू शंकर पवार व पोपट उलुशा पवार आणि इतरांनी पाणी फवारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पंचनामा झाला आहे. संशयितांवर तातडीने कारवाई करून आपणास न्याय व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वसंत टोपले यांनी केली आहे.