रावेर तालुक्यातील सिंगत गावात सुमारे ३० ते ३५ वयोगटातील तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज दि. २५ रोजी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतात जात असताना एका शेतमजुराला मृतदेह दिसला. त्या मजुराने तात्काळ सिंगतचे सरपंच प्रमोद चौधरी यांना याबाबत माहिती दिली. सरपंच चौधरी यांनी निंभोरा पोलिसांना माहिती दिली असता, काही वेळातच निंभोरा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. [ads id="ads2"]
त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, घटनास्थळी दोन मतदान कार्ड आढळून आले. एका कार्डवर कैलास भिका पाटील यांचे नाव व पत्ता पिंप्रिसेकम (ता. भुसावळ) असा लिहिला आहे. यावरून मतदान कार्ड मृत व्यक्तीचे असल्याचे दिसून येते. पोलिसांनी पिंपरीसेकम येथील सरपंचाशी संपर्क साधला असून मृताची चौकशी सुरू आहे.
मृतदेहाजवळ निलेश रमेश निकम या नावाचे आणखी एक ओळखपत्र सापडले असून, त्याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, फिंगर प्रिंट तज्ञ, स्निफर टीम आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपास केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पुढील तपास निंभोरा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ व पोलीस हेडकाँन्स्टेबल विकास कोल्हे, पो.काँ सुरेश अढायगे हे करीत आहे.
दुसऱ्या मतदान कार्डाचा काय संबंध?
मृतदेहाजवळ पाकीट सापडले असून, यात मतदान कार्ड आणि पॅनकार्ड मिळून आले. यावर नाव निलेश रमेश निकम (रा. फेकरी, ता. भुसावळ) असा पत्ता लिहिला आहे. निकम हे निंभोरा तालुका रावेर येथील १३२ केव्ही महापारेशन सबस्टेशनवर ऑपरेटर असून, ते सुमारे १५ दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांकही बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.