नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून नुकतेच काही दिवसापूर्वी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची व पालकांची कागदपत्रे जमवाजमव करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. परंतु नांदगाव तहसील कार्यालयातील सेतू केंद्र व सीएससी सेंटर केंद्रामध्ये सर्व्हर नेहमीच डाउन राहत असल्याने विद्यार्थी आणि पालकांची शैक्षणिक कागदपत्रे काढण्यासाठी दमचाक होत आहे.
नांदगाव येथील सेतू केंद्र व सीएससी सेंटर केंद्रात वेबसाईट नेहमीच बंद होत असल्याने वेळेवर दाखले मिळत नसल्यामुळे व प्रवेश घेण्यासाठी कालावधी कमी असल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्याना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लागणारी जातीची दाखले, नॉन क्रिमिलियर, उत्पन्नाचे दाखले, नॅशनॅलिटी, डोमिसाईल आदी शैक्षणिक कागदपत्रे काढण्यासाठी तालुक्यातून विद्यार्थ्यांनी नांदगाव शहरातील सेतू केंद्र व सीएससी सेंटर केंद्रामध्ये येत आहेत. मात्र सेतू केंद्रातील सर्व्हर गेल्या पंधरा दिवसापासून मंद गतीने चालणे अथवा बंद पडणे या कारणांमुळे विद्यार्थ्यांना महत्त्वाची कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय, अभियांत्रिकी, पदवी शिक्षणाच्या पुढील प्रवेश प्रक्रियेत सदरची ही कागदपत्रे महत्त्वाची आहेत. त्यातच प्रवेशासाठी महाविद्यालयांची मुदत संपत आल्याने विद्यार्थ्यांच्या मनात भीती व संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शासनाची अधिकृत वेबसाईट गेल्या अनेक दिवसापासून चालू बंद होत असल्यामुळे दाखले वेळेत मिळत नाही. नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी व पालकांचे पैशांची व वेळेची देखील नुकसान होत आहे. वेबसाईट सुरू होण्याच्या अपेक्षेने दिवसभर थांबून देखील काम होत नसल्याने नाईलाजाने माघारी फिरावी लागत आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी जाऊन देखील हीच अवस्था होते. तरी शासनाने शासनाची वेबसाईट सुरू कशी राहील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची नुकसान होणार नाही. तसेच सर्वसामान्य नागरिकांना देखील कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल शासनाने घेण्याची काळाची गरज आहे असे संविधान आर्मी संघटनेच्या नांदगाव महिला तालुकाध्यक्ष सौ.सुनंदा बागुल यांनी बोलताना म्हटले आहे.


