रावेर प्रतिनीधी (विनोद कोळी) ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना मार्फत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून रावेर महावियालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जी. आर. ढेंबरे उपस्थित होते. ते आपल्या भाषणात म्हणाले की, युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे. अमली पदार्थांचे व्यसन केल्यामुळे तरुणांचे जीवन समस्याग्रस्त होते. संपूर्ण कुटुंब, समाज, राष्ट्रला याची किंमत मोजवी लागते. निरोगी युवक हीच राष्ट्राची खरी संपत्ती असते. तरुणांनी आत्मभान ठेवत अमली पदार्थांचा त्याग केला पाहिजे. असे प्रतिपादन डॉ.ढेंबरे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी अध्यक्षीय भाषणात अंमली पदार्थ सेवना मुळे होणारे दुष्परिणाम यावर विश्लेषण करून याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. या ऑनलाइन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील तर आभारप्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


