यावल (सुरेश पाटील) गेल्या महिन्यापासून यावल शहरापासून यावल भुसावळ रस्त्याचे काँक्रिटीकरण व रस्त्याच्या बाजूला गटारीचे बांधकाम सुरू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता यांच्याकडे काल दि.१६ ऑक्टोबर २०२३ रोजी केली.[ads id="ads1"]
दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की,आपल्या कार्यक्षेत्रातील यावल येथील अत्यंत वर्दळीच्या रहदारीच्या मार्गावर भुसावळ नाक्यापासून सुरू असलेल्या व गटारीच्या कामामध्ये स्थानिक नद्या नाल्या मधील माती मिश्रित वाळू वापरली जात आहे.तसेच या बांधकामामधे मंजूर प्लॅन, इस्टिमेट,निविदा मधील अटी शर्ती प्रमाणे उत्कृष्ट दर्जाचे, प्रमाणाचे बांधकाम साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे.हा रस्ता अत्यंत रहदारीचा असून जळगाव जिल्ह्यासह विविध राज्यातील अवजड वाहने यावल भुसावळ रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ये- जा करीत असतात.तरी अशा प्रकारे गुणवत्ता नसलेला रस्ता तयार झाल्यास तो फार काळ टिकणार नाही.[ads id="ads2"]
तसेच सिमेंट काँक्रीट करणाचे काम कासवगतीने सुरु आहे. वाहतुकीसाठी रस्त्याच्या बाजूने ठेकेदाराने आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता यांनी रस्त्याच्या बाजूला वाहतुकीसाठी पर्यायी पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्थित रस्ता न केल्याने,तसेच कामाच्या ठिकाणी एकेरी वाहतूक होण्यासाठी लाल झेंडे दाखविणारे मजूर व्यक्ती व्यवस्थित आणि ठराविक अंतरावर न ठेवल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे,भुसावळ कडे जाणाऱ्या आणि भुसावल कडून यावलकडे येणाऱ्या वाहनांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.व न्यायालयात न्याय मागावा लागेल असे दिलेल्या निवेदनात प्रा.मुकेश येवले यांनी नमूद करून महाराष्ट्र राज्य सा.बां. मंत्री,सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक व जळगाव यांच्याकडे माहितीस्तव तक्रार पाठविली आहे.