फैजपूर (प्रतिनिधी – आदित्य गजरे) : फैजपूर पोलीस ठाण्यात दि. 15/09/2025 रोजी दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व दुर्गादेवी मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान दुर्गोत्सव काळात कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन होऊ नये, यावर विशेष भर देण्यात आला. सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण न करता रस्ते मोकळे ठेवावेत, प्रतिष्ठापना व विसर्जन ठरलेल्या वेळेत करावे, गुलाल वापर टाळावा, डीजेचा वापर करू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच सार्वजनिक मंडळांनी रात्री सुरक्षिततेसाठी स्वतःचे सदस्य नेमण्याचे आवाहन करण्यात आले.गणेश मूर्तीची विटंबना होणार नाही, आक्षेपार्ह गाणी, पोस्टर व बॅनर्स लावले जाणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले. उत्सव शांततेत, सुसंवादात व सुरक्षिततेत पार पडावा यासाठी सर्व नागरिक, मंडळे व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.यावेळी विविध मंडळांच्या अडचणी व समस्या ऐकून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.