यावल तालुका प्रतिनिधी : राहुल जयकार
फैजपूर शहरातील मौलाना अब्दुल कलाम आजाद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या परिसरातील मुख्य रस्ता दयनीय अवस्थेत असून त्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळा प्रशासनाने तसेच पालक व नागरिकांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
(ads)
फैजपूर पोलिस स्टेशनपासून शाळेपर्यंतच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो. शेकडो विद्यार्थी व शिक्षक रोज या मार्गाने शाळेत ये-जा करतात. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
(ads)
शाळेच्या प्राचार्यांनी या पूर्वीही शासन व स्थानिक प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. “खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होण्याचा धोका कायम आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने , स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे,” असे प्राचार्यांचे म्हणणे आहे.
(ads)
पालक व स्थानिक नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडथळे येऊ नयेत, यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.