सावदा प्रतिनिधी :
सावदा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित युवा संवाद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व लाभले. परिसरातील हजारो युवक-युवतींच्या उपस्थितीने वातावरण भारावून गेले.
मेळाव्याची सुरुवात सुजात आंबेडकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभाताई पाटील यांनी केले.
(ads)
युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे यांनी आपापले मनोगत व्यक्त करत तरुणाईला चळवळीत सक्रीय होण्याचे आवाहन केले.
*कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अनोमदर्शी तायडे सर यांनी भाषणात ठामपणे सांगितले की, “आजचा तरुण उद्याचे देशाचे भविष्य आहे. मात्र हा तरुण चळवळीपासून भरकटलेला आहे. समाजकारणात आणि राजकारणात पुन्हा त्याला जागं करण्याची जबाबदारी आपली आहे."
(ads)
प्रसंगी युवा संवाद मेळाव्याला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, "जोपर्यंत युवक समाजकारण आणि राजकारणात उतरून झगडणार नाहीत, तोपर्यंत राजकारणातील घाण व समाजकारणातील कुरूप वास्तव कधीही संपणार नाही," आज देशात बेरोजगारीने थैमान मांडलेले आहे, तरुणांना रोजगार मिळत नाहीत. तरुणांच्या समाजकारण आणि राजकारण यापासून दूर राहिल्यानेच नाकर्ते राजकारणी यांना सोयीचे होते. व त्यातूनच भ्रष्टाचार, अन्याय अत्याचार वाढत आहेत. भविष्यात जर असेच सुरू राहिले तर येणाऱ्या पिढीसाठी आजचा तरुण हा गुन्हेगारतथा अपराधी असेल असे ते ठामपणे म्हणाले.
(ads)
आज युवकांच्या हातात ताकद आहे, विचार आहे, पण दुर्दैवाने तोच युवक राजकारणापासून दुरावलेला आहे. हीच पोकळी सत्ताधाऱ्यांनी आणि भ्रष्ट राजकारण्यांनी गिळून टाकली आहे. आंबेडकर यांनी दिलेला हा इशारा तरुणांना हादरवणारा होता.
*केळी कामगारांचा आवाज कुठे आहे?*
ऊसतोड कामगार महामंडळ आहे, मग केळी कामगारांचं महामंडळ का नाही? केळी पट्ट्यातील हजारो मजुरांचा प्रश्न कायम गुलामगिरीत आहे. त्यांना रोजगाराची हमी नाही, शिक्षणाची हमी नाही, आरोग्याची सोय नाही! हीच ज्वलंत वस्तुस्थिती आंबेडकर यांनी या युवा संवाद मेळाव्यात अधोरेखित केली. त्यांनी ठणकावून सांगितले की, "वंचित बहुजन आघाडी केळी कामगारांच्या हक्कासाठी कायम लढत आहे पुढेही भविष्यात लढणार. त्यांचं महामंडळ आम्ही उभारणारच." त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही.
(ads)
*रोजगार–शिक्षण–आरोग्य या तिहेरी लढाईला सज्ज*
केळी कामगारांच्या घामाचा दर रोज मातीमोल होत आहे. त्यांचा मुलगा डॉक्टर होईल का, त्यांची मुलगी शिक्षिका बनेल का – या प्रश्नांची उत्तरे आजही काळोखात आहेत. सरकारी दवाखान्यांच्या दारात उपचाराऐवजी मृत्यू मिळतो, हे वास्तव आंबेडकरांनी समोर ठेवले. वंचित बहुजन आघाडी रोजगार, शिक्षण आणि आरोग्याच्या तिहेरी लढाईसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. केळी कामगारांना आतापर्यंत कुठलाही शासकीय लाभ मिळत नाही. इथले राजकारणी फक्त स्वार्थी आणि पोट भरू आहेत. यांनी आतापर्यंत केळी कामगारांच्या प्रश्नावर कधीही आवाज उठवलेला नाही. फक्त मतांचे राजकारण केले.
(ads)
*युवकांच्या खांद्यावरच देशाचे भविष्य*
“बदलाची खरी मशाल ही तरुणाईच्या हातात आहे. जर तरुण पुढे सरसावले, तर कुठलाही अन्याय टिकू शकणार नाही,” असे आवाहन करत त्यांनी युवकांना चळवळीत सामील होण्याची हाक दिली.
आज प्रश्न आहे तो एकच – तरुण उठतील का? जर ते उठले नाहीत, तर भ्रष्टाचार, अन्याय, शोषण, बेदरकारपणा याचं राज्य कायम राहणार. सुजात आंबेडकर यांनी दिलेली चेतावणी ही केवळ राजकीय भाषण नाही; ती तरुणांच्या अंगावर शहारे आणणारी आज वास्तव परिस्थिती आहे.
(ads)
*विशेष आकर्षण*
या मेळाव्यात सावखेडा येथील तडवी समाजातील असंख्य तरुणांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक उर्जा मिळाली.
या मेळाव्याला परिसरातील हजारो युवकांनी गर्दी केली. सुजात आंबेडकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे तरुणांमध्ये नवचैतन्य संचारले असून, चळवळीला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
(ads)
यावेळी कार्यक्रमाला वंबआ चे रावेर तालुकाध्यक्ष मुश्ताक शेख, यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विजय भोसले, जिल्हा संघटक विजय अवसरमल, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अॅड. योगेश तायडे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संविधानवादी टीमसह वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.