जळगाव :- महात्मा फुले यांनी जनतेला धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्या करिता , मानवाला प्रतिष्ठा मिळवून देण्याकरिता तसेच स्त्री - पुरुष समानता प्रस्थापित करण्या करिता ' सत्यशोधक समाज ' स्थापन केला . त्यांनी शूद्र - अतिशूद्र समाजाच्या शिक्षणावर सर्वाधिक भर दिला , सर्व समस्यांचे मूळ अज्ञान आहे असे त्यांनी पटवून दिले . त्यामुळेच भारतात ज्यांना सामाजिक परिवर्तनाची चळवळ चालवायची असेल त्यांना सत्यशोधक समाजाच्या विचारधारेला अव्हेरून चळवळ चालविताच येणार नाही . कारण समाज परिवर्तनाच्या चळवळीची मातृसंस्था सत्यशोधक समाज आहे असे अभ्यासपूर्ण विवेचन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
(ads)
सत्यशोधक समाज स्थापना दीना निमित्त २४ सप्टेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित ' सत्यशोधक समाजाची वर्तमान फलश्रुती ' या विषयावर मुख्यावक्ता म्हणून भाषण करताना वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की , महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून जी चळवळ चालविली त्यामुळे आजची स्त्री सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत , सार्वजनिक जीवनात ताठमानेने जगत आहे , शुद्र , अतिशूद्र समाजाला प्रतिष्ठा मिळत आहे , आरक्षण संकल्पना उदयास येवून अनेकांना त्याचा आज फायदा होत आहे तर काही जाती आरक्षणाची मागणी करत आहेत . तामिळनाडू मध्ये सत्यशोधक समाजाच्या विचारधारेमुळे उदयास आलेला डी.एम.के. वा ए. डी.एम. के. पक्ष सत्तेत आहे . शेती विकास , शेतीतील सिंचन , आधुनिक शेती हे महात्मा फुले यांच्या कार्याची फलश्रुती आहे असेही वाघ यांनी स्पष्ट केले.
(ads)
अध्यक्षस्थानी प्रशाळेचे संचालक तथा प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. म. सु. पगारे होते . त्यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले यांनी जो संघर्ष केला त्याला भारतीय इतिहासात तोड नाही . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सामाजिक , धार्मिक रूढी , परंपरांना छेद देण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला . त्यांच्या कार्याला , विचारला भारतीय जनतेने स्वीकारले असते तर आज भारताचे चित्र काही वेगळेच राहिले असते असे विचार व्यक्त केले.
(ads)
प्रा. डॉ. पवित्रा पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी आज भारतात प्रामुख्याने महिलांची जी प्रगती झाली आहे , जी स्त्री पुरुष समता प्रस्थापित झाली आहे त्यामागे महात्मा फुले , सावित्रीबाई फुले यांचे योगदान आहे असे विचार व्यक्त केले .
कार्यक्रमास प्राध्यापक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.