छत्रपती संभाजीनगर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या निर्घृण हल्ल्याने महाराष्ट्रातील लोकशाहीची गळचेपी सुरू झाल्याचा गंभीर आरोप करत पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी पुन्हा एकदा तीव्रतेने समोर आली आहे.
(ads)
या पार्श्वभूमीवर एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले की, “हा हल्ला केवळ गुन्हा नाही, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला घाव आहे. पत्रकारांवर हल्ला करणारे गुंड कोणाच्या छत्रछायेखाली हिंडत आहेत, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारतो आहे.”
(ads)
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रतन कुमार साळवे म्हणाले की, सरकारने या घटनेवर गप्प राहण्याऐवजी तातडीने कडक पावले उचलावीत. पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे, किरण ताजणे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना ताबडतोब जेरबंद करून कठोर शिक्षा दिली नाही, तर पत्रकार हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल.
(ads)
पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारने पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका जाहीर करावी, अन्यथा राज्यभर भव्य आंदोलन पेटवले जाईल, असा इशारा साळवे यांनी दिला. यावेळी रशपाल सिंगअट्टल, ज्ञानेश्वर खंदारे,संजय सोनखेडे, रूपचंद गाडेकर, मनीष अग्रवाल, बाजीराव सोनवणे, शेख शफीक,नजीमोद्दीन काजी, अविनाश पहाडे, राज ठाकरे,सुरेश शिरसागर, नदीम सौदागर, विजय सोनवणे, प्रकाश खजिनकर आदी संपादकासह पत्रकारांची उपस्थिती होती.