_प्रिया तेंडुलकर एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगल्या लेखिका देखील होत्या. त्यांचे वडील विजय तेंडुलकर हे प्रसिद्ध नाटककार होते. रजनी हे त्यांचे पात्र लोकप्रिय झाले. भारताची पहिली टीव्ही स्टार अशी प्रिया तेंडुलकर यांची ओळख होती.त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्या एक उत्तम अभिनेत्री तर होत्याच पण त्या एक चांगल्या लेखिकाही होत्या. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनयासह त्यांनी अनेक कथाही लिहिल्या होत्या. प्रिया तेंडुलकरला बासू चॅटर्जींच्या "रजनीशो"मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. सन १९८५मध्ये बनलेल्या या मालिकेत प्रिया यांनी ''रजनी'' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. शोमधील तिचे पात्र एका सामान्य गृहिणीचे होते, जिने न घाबरता भ्रष्टाचार आणि समाजातील चुकीच्या प्रथांविरोधात आवाज उठवला. त्यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी सदर लेखप्रपंचातून प्रस्तुत करताहेत.... संपादक._
(ads)
प्रिया तेंडुलकर यांचा जन्म दि.१९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. त्यांचे वडील विजय तेंडुलकर हे प्रसिद्ध नाटककार होते. प्रिया यांना दोन बहिणी आणि एक भाऊ होते. त्यांचा लहानपणापासूनच अभिनयाकडे कल असल्याचं म्हटले जाते. त्यामुळेच अभ्यासासोबतच त्यांनी अभिनयाच्या जगातही प्रवेश केला. त्या एक अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका होत्या. त्यांना प्रामुख्याने 'रजनी' या दूरचित्रवाणी मालिकेतील भूमिकेमुळे ओळखले जाते. त्यांच्या अभिनयाची सुरुवात मराठी रंगभूमीवर झाली आणि नंतर त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले. यादरम्यान त्या करण राझदानच्या प्रेमात पडल्या. प्रिया या शोमध्ये फक्त करण राजदानमुळेच आल्या होत्या. शोचे लेखक करण राजदान यांनी रजनीच्या भूमिकेसाठी प्रियाचे नाव बासू चॅटर्जी यांना सुचवले होते. करण राजदान म्हणाले, "मी तिला आधी भेटलो नव्हतो. पण प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची मुलगी असल्याने ती या भूमिकेसाठी योग्य आहे, असे मला वाटले". या शोमध्ये करण राजदानने प्रियाच्या पतीची भूमिका साकारली होती. या मालिकेदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रियाने सन १९८८मध्ये अभिनेता आणि लेखक करण राजदानशी लग्न केले. हे लग्न केवळ सात वर्षे टिकले आणि नंतर दोघेही वेगळे झाले. आपकी अदालत, प्रिया तेंडुलकर टॉक शो या कार्यक्रमांद्वारे दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावर आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी, रसिकांची लाडकी रजनी आणि मराठी साहित्यविश्वात कथांनी आपली स्वतंत्र मोहर उमटवणारी बंडखोर लेखिका प्रिया. प्रख्यात साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कन्या होत्या,
(ads)
वडिलांतील बंडखोरपणाबरोबरच सर्जनशीलता व लेखनगुणांचा वारसाही घेऊन त्याञजन्माला आल्या होत्या. लहानपणापासून त्या ज्यांना आदर्श मानायच्या, ते वडील हेच त्यांचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी त्या एकदम दुबळ्या, लाजाळू, रडूबाई होत्या. पण त्याच प्रिया तेंडुलकरने नंतर बँक कर्मचारी, पंचतारांकित हॉटेलात स्वागतिका, मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, चित्रवाणी मालिकांतील यशस्वी सूत्रसंचालिका अशा निरनिराळया भूमिका जीवनात यशस्वीपणे वठवल्या.
वडिलांबरोबर त्या नाटयसृष्टीत आल्या पण नंतर तेथे त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. ‘तो राजहंस एक’ हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी बेबी, एक हट्टी मुलगी, सखाराम बाईंडर, कन्यादान, कमला, गिधाडे, फुलराणी आदी नाटकांत भूमिका केल्या. शिरिष पै यांच्या "कळी एक फुलत होती'’ या नाटकात वयाच्या अठराव्या वर्षी काम करण्याची संधी त्यांना लाभली. बासू चॅटर्जींनी त्यांना ‘'रजनी’' या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणाऱ्या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडुलकर या नावाला खऱ्या अर्थाने वलय मिळवून दिले. अगदी अलीकडे त्यांनी ‘'प्रिया तेंडुलकर टॉक शो’' सुरू केला. या शोत त्यांनी राजकीय व सामाजिक विषयांना स्थान दिले. त्याचबरोबर अडोस-पडोस, जिंदगी, खानदान, बॅ. विनोद, हम पाँच, दामिनी यांसारख्या मालिकांतून त्यांनी आपल्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवले. श्याम बेनेगल यांना सन १९७४ साली "अंकुर" चित्रपट बनवताना त्यातील अनंत नागच्या पत्नीच्या भूमिकेसाठी त्यांना घ्यावेसे वाटले आणि त्या अभिनेत्रीही बनून गेल्या. गोंधळात गोंधळ, माळावरचं फूल, मायबाप, देवता, राणीने डाव जिंकला, मुंबईचा फौजदार, माहेरची माणसं, सस्ती दुल्हन महँगा दुल्हा, कालचक्र, माझं सौभाग्य, हे गीत जीवनाचे, और प्यार हो गया, अशा चित्रपटांत, त्यांनी भूमिका केल्या. गुजराती मराठी चित्रपटांतील काही भूमिकांबद्दल त्यांनी अभिनयाचे पुरस्कारही मिळवले. आपल्या चित्राची प्रदर्शनेच त्यांनी भरवली होती. बी.ए.झाल्यानंतर जे.जे.मधून चित्रकला विषयातील प्रशिक्षणही दोन वर्षे घेतलेल्या प्रियाला केवळ चित्रकला शिक्षिका व्हायचे नव्हते. ‘'जन्मलेल्या प्रत्येकाला’' हा तिचा कथासंग्रह दमाणी साहित्य पुरस्कार देऊन गेला. जगले जशी, ज्याचा त्याचा प्रश्न, जावे तिच्या वंशा आदी पुस्तकांनी तिला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळवून दिला. एक वेगळया वाटेने जाणारी कथालेखिका म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला.
(ads)
एकता कपूरच्या ''हम पांच'' शोमध्येही केले काम- रजनी व्यतिरिक्त त्यांनी एकता कपूरच्या "हम पांच"मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती. ९०च्या दशकातील या शोमध्ये त्यांनी फोटो फ्रेमच्या माध्यमातून बोलणाऱ्या मृत पत्नीची भूमिका साकारली होती. प्रियाच्या या व्यक्तिरेखेचे लोकांनी खूप कौतुक केले. गुलजार दिग्दर्शित ''स्वयंसिद्ध''मध्येही त्यांनी काम केले. प्रिया तेंडुलकर यांनी टीव्हीवर "द प्रिया तेंडुलकर शो" आणि "झिम्मेदार कौन" सारखे यशस्वी टॉक शो देखील केले. या टॉक शोमध्ये प्रिया यांच्या आक्रमक शैलीचे खूप कौतुक झाले.
रजनी या नावाने प्रसिद्ध झाली- प्रिया तेंडुलकरने अंकुर, मोहरा आणि त्रिमूर्ती यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. १९७४ मध्ये श्याम बेनेगल यांच्या अंकुर या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे प्रिया यांचे अभिनेता अनंत नाग यांच्याशीही नाव जोडले गेले. पण दि.१९ सप्टेंबर २००२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. प्रियाने 'रजनी' या मालिकेत इतका दमदार अभिनय केला होता की, घराघरात त्या रजनी या नावानेच ओळखल्या जाऊ लागल्या. ही मालिका सामाजिक विषयांवर आधारित होती, त्यामुळे प्रत्येक स्त्री स्वतःला रजनीच्या पात्राशी जोडून पाहायची. त्यांचे खूपच कमी वयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने अटल बिहारी वाजपेयी यांनीही शोक व्यक्त केला होता.
!! जयंती निमित्त प्रिया तेंडुलकर यांना विनम्र अभिवादन जी !!
- संकलन व सुलेखन -
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.



