रावेर तालुका प्रतिनिधी (प्रशांत गाढे)
रावेर शहरातील पालिकेच्या हद्दीत या पेव्हर ब्लॉकचे काम न करता ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी संगनमत करुन १० लाखांचे बिल काढल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी व कोणतीही कारवाई न केल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने रावेर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
(ads)
रावेर नगरपालिका हद्दीत गट नंबर ११६२ मध्ये १० लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम मंजूर होते. ते काम खिरोदा येथील ठेकेदार मयूर चौधरी यांनी न करताच अधिकाऱ्यांशी संगनमत करून बिल काढले. त्यांच्यावर व संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ता तोलनकुमार भाट यांनी तक्रार देऊन ही चौकशी झाली नाही. तसेच कोणतीही कारवाई न झाल्याने ठेकेदार मयूर चौधरी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याविरोधात तहसील कार्यालयासमोर भाट हे आमरण उपोषणास बसले आहेत.
(ads)
दरम्यान, येथील सामाजिक कार्यकर्ते तोलनकुमार भाट यांनी महिन्याभरापूर्वी शहरातील गट नंबर ११६२मध्ये दलित वस्ती नसताना दलित वस्ती दाखवून १० लाखाचे पेव्हर ब्लॉकचे विकासकाम मंजूर केले होते. तर गट नंबर ११६२मध्ये कुठेही पेव्हर ब्लॉक बसवले नसल्याचे श्री. भाट यांचे म्हणणे आहे. तसे पुरावेही त्यांनी वरिष्ठांना दिले आहेत. तर बिल काढले म्हणून श्री. भाट यांनी सर्व पुरावे गोळा करून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करुन चौकशीची मागणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु, ४० दिवस होऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने श्री. भाट हे तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
(ads)
जोपर्यंत ठेकेदार मयूर चौधरी आणि संबंधित अधिकारी यांची चौकशी होऊन यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सुराणा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालिकेने दाखवलेल्या गट नं. ११६२मध्ये व कार्यारंभ आदेशाप्रमाणे पेव्हर ब्लॉगचे काम पूर्ण झाले आहे, असे सांगितले.
(ads)
एकाच कामाच्या वेगवेगळ्या रकमेच्या मिळाल्या पावत्या गट नं ११६२ मध्ये पेव्हर ब्लॉकचे काम झाल्यासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागितली असता, पालिकेकडून अधिकृतपणे वेगवेगळ्या रकमेच्या वेगवेगळ्या दिनांकाच्या एकाच कामाच्या तीन ताबा पावत्या मिळाल्याचे तक्रारदार तोलनकुमार भाट यांनी सांगितले.
(ads)
●या तक्रारीनुसार गट नंबर ११६२ मध्ये पेव्हर ब्लॉकचे काम झाले आहे किंवा नाही, त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः रावेर शहरांमध्ये आले होते. पहाणी केली असता तेथे काम झाल्याचे दिसून आले. जी जागा दाखवली त्या जागेवर पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण केलेले दिसून आले. तर त्या प्रभागात (गट ११६२ नंबर) दलित वस्ती आहे किंवा नाही, हे पालिका ठरवत असते.
स्वाती एस. सुराणा,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव
बांधकाम विभाग अभियंताने मात्र आंदोलनस्थळास भेट न दिल्याने संशयाच्या भोवऱ्यात ?
गेल्या दोन दिवसापासून रावेर तहसील समोर उपोषण सुरू आहे. परंतु उपोषण ठिकाणी आता पर्यंत कोणताच अधिकारी फिरकला नसल्याने खरच काही गोलमाल तर नाही ना? अशी चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे.



