देशभक्तीच्या भावनेने दुमदुमले सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय परिसर
ऐनपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त सामूहिक गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
७ नोव्हेंबर २०२५ रोजी वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने शासनाने राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्ये सामूहिक वंदे मातरम् गायनाचे परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार आज सकाळी १० वाजता महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राचार्य यांनी एकत्र येऊन वंदे मातरम् गीताचे गायन केले.
(ads)
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी गीताचा ऐतिहासिक संदर्भ सांगताना म्हटले की, “बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत लिहिले. १८९६ मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत प्रथम सादर केले.” हळूहळू हे गीत स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक बनले आणि वंदे मातरम् चा घोष ब्रिटिशांना धडकी भरवणारा ठरला, असेही त्यांनी नमूद केले.
(ads)
भविष्यातील पिढीला या गीताचे महत्त्व समजावे, यासाठी केंद्र शासनामार्फत पुढील वर्षभर चार टप्प्यांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहितीही प्राचार्यांनी दिली.
कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. जे. पी. नेहेते यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एच. एम. बाविस्कर यांनी केले.



