संपादकीय विशेष लेख : मुक्या समाजाचा बुलंद आवाज "मूकनायक"

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


          हजारो वर्षांपासून इथला शूद्र , अतिशूद्र म्हणून ओळखला जाणारा समाज एक मुके जनावर सारखा जगत होता . त्याचे हंबरणे जणू त्याच्या गोठ्यापुरते सीमित होते . भारतात इंग्रज आले , त्यांनी इंग्रजी शाळा सुरू केली . महात्मा फुले यांनी या शाळा या मुक्या समाजापर्यंत नेल्या आणि या समाजाची दुःख , हाल अपेष्टा , त्यांच्या भाव भावना मांडण्याचा प्रयत्न केला . महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यावेळच्या महार समाजातील एक लढाऊ व्यक्तिमत्व असलेले गोपाळ बाबा वलंगकर यांनी त्यावेळच्या दीनमित्र , दीनबंधू , सुधारक अश्या वृत्तपत्रांतून मुक्या समाजाच्या व्यथा , अन्याय , अत्याचार मांडल्या . त्यांनी १९८८ मध्ये ' विटाळ विध्वंसक ' नावाचे पुस्तक लिहून धर्माच्या ठेकेदारांना एकूण २६ प्रश्न विचारून नवे वादळ निर्माण केले .

  (ads)

       गोपाळ बाबा वलंगकर यांच्या या प्रयत्नांनी प्रेरित होउन किसन फागोजी बनसोड यांनी ' निराश्रित हिंद नागरिक ' साप्ताहिक सुरू केले . शिवराम जानबा कांबळे यांनी १९०८ मध्ये ' सोमवंशीय मित्र ' हे साप्ताहिक सुरू केले. किसन फागोजी बनसोड यांनी १९१८ ला ' मजूर पत्रिका ' नावाचे दुसरे साप्ताहिक सुरू केले. या महार समाजातील नेत्यांनी आपले स्वतंत्र वृत्तपत्रं सुरू करून या देशातील गुलामगिरीची लक्तरे वेशीवर टांगली . धर्माला प्रश्न विचारण्याचे , समाजाचे प्रश्न मांडण्याचे , माणूस म्हणून जगण्याचे हक्क मागणारे , स्त्रियांचे शोषण सांगणारे लिखाण वरील नियतकालिकातून जसे उमटत होते तसेच तेंव्हाच्या जागरूक , डेक्कन रयत , विजयी मराठा , ज्ञानप्रकाश , सुबोध पत्रिका व अन्य काही नियतकालिकातून सुद्धा उमटू लागले होते . खास करून अस्पृश्य समाजाने सुरू केलेली नियतकालिके अल्पायुषी ठरत गेली . वलंगकर , कांबळे , बनसोड हे त्या काळातील अस्पृश्य समाजाचे नामांकित पुढारी म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते . 

    (ads)

   पुढं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे शिक्षण सुरू असतानाच अस्पृश्य समाजाचे स्वतंत्र मुखपत्र असण्याबाबत प्रयत्न केले . या दरम्यान ते सिडनेहॅम येथे प्राध्यापक म्हणून सेवारत होते . आपल्या समाजाचे मुखपत्र आपणच चालविण्या करिता त्यांना तांत्रिक अडचणी येऊ लागल्या . या करिता त्यांनी संपादक म्हणून अन्य व्यक्तीवर जबाबदारी देऊन तांत्रिक बाबी दूर केल्या व ३१ जानेवारी १९२० रोजी मुक्या समाजाचा बुलंद आवाज ठरणाऱ्या ' मूकनायक ' या पाक्षिकाची सुरवात केली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपादकीय लेखन लिहून देत असत . संपादक म्हणून त्यांनी पांडुरंग नंदराम भटकर या पदवीधर असलेल्या व सामाजिक , पुरोगामी चळवळीत अतिशय प्रभावी काम करीत असलेल्या व्यक्तीची निवड केली . पांडुरंग भटकर हे त्याकाळी बरेच नावाजलेले होते . त्यांनी ब्राम्हण मुली सोबत लग्न केले असल्याने अधिकच नावाजले होते . त्यांना लिखाणाची आवड असल्याने त्यांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली . ज्ञानेश्वर घोलप हे व्यवस्थापक होते . भटकर यांच्या नंतर हेच घोलप संपादक झाले . 

   (ads) 

         मूकनायक सुरू करताना बाबासाहेब म्हणाले की , " कोणतीही चळवळ यशस्वी करावयाची असेल तर त्या चळवळीचे स्वतंत्र वर्तमानपत्र असणे आवश्यक असते . ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते त्या चळवळीची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे असते ".

   (ads)

     ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायकचा जन्म झाला अर्थात पहिला अंक प्रसिद्ध झाला . १९२० मध्ये सुद्धा आज सारखाच फसवा, खोटा राष्ट्रवाद फोफावला होता . आम्हीच फक्त देशभक्त आहोत , आम्हालाच राष्ट्रवाद माहीत आहे अश्या तोऱ्यात काही मंडळी वावरत होती , आपल्याच देशातील दुसऱ्या समाजाचा जास्तीत जास्त द्वेष करणे म्हणजे जास्तीत जास्त देशभक्त ठरविणे ही संकल्पना त्यांनी मांडली . अश्या बाजार बुणग्या लोकांना मोठी प्रसिध्दी सुद्धा मिळत होती . मात्र खरा राष्ट्रवाद काय असतो या विषईचे प्रतिबिंब मूकनायक मध्ये आपणास वाचावयास मिळते . या अंकात स्पष्टपणे लिहिले की , ' जसे एक माणूस म्हणजे एक कुटुंब किंवा एकच घर म्हणजे समाज किंवा गाव , प्रांत , देश होऊ शकत नाही , तद्वत एकाच राष्ट्रातील एकच विवक्षित जात अगर समाज किंवा गाव एक राष्ट्र होऊ शकत नाही . तर एका पेक्षा अधिक माणसे मिळून एक कुटुंब , अनेक कुटुंबे मिळून एक समाज , अनेक समाज मिळून एक गाव , अनेक गावं मिळून एक प्रांत व अनेक प्रांत मिळून एक राष्ट्र होत असते . एकाच कुटुंबातील माणसांमध्ये एकमेकांविषयी जशी आपलेपणाची भावना असते तशीच ती प्रत्येक समाजात असल्या शिवाय राष्ट्राचा जिवंतपणा दिसणे शक्य नाही . आणि , ज्या ठिकाणी असा जिवंतपणा असणार नाही त्या ठिकाणी इतरांच्या चढाओढीत अपयश हे असणारच.

  (ads)

     एक राष्ट्र म्हणजे एक कुटुंब अशी शिकवण या देशाला सर्वप्रथम याच मूकनायक ने दिली आहे . मूकनायक तसा निव्वळ एका जातीचा , व्यक्तीचा वा चळवळीचा राहिला नाही . इतर वृत्तपत्रात अस्पृश्य समाजाच्या प्रश्नांना जागा मिळाली नसेल पण अस्पृश्य समाजाच्या या मूकनायकाने सर्व देशाचे प्रश्न ऐरणीवर मांडले आहेत . माणसाचे माणूसपण ( मग तो अस्पृश्य असो वा अन्य ) काय असते , त्याचे हक्क काय असतात याची शिकवण या मूकनायकने दिली आहे . मुक्या समाजाचे मुक पत्र न राहता वाचाळविरांचे मुख बंद करणारे मुखपत्र राहिले .

   (ads)

     या अंकास राजर्षी शाहू महाराज यांनी ₹ २५०० ची मदत केली आहे . निधी अभावी या मूकनायक चे केवळ १४ च अंक निघाले आहेत मात्र वृत्तपत्रं कसे निस्पृह असावे याची शिकवण तो देऊन गेला आहे , वृत्तपत्राच्या इतिहासात आपला ठसा उमटवून गेला आहे .

     

लेखक... जयसिंग वाघ , अजिंठा हाउसिंग सोसायटी,

      अजिंठा चौक, जळगाव. संपर्क. ९८८१९२८८८१

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!