ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे युवती सभा व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भय अभियानाअंतर्गत काठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दि. २० जानेवारी २०२६ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या शुभहस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थिनींनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरती मर्यादित न राहता स्वतःला शारीरिक, मानसिक व वैचारिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण बनवावे, असे प्रतिपादन केले. आत्मसंरक्षण हे आजच्या काळातील अत्यावश्यक कौशल्य असून आत्मनिर्भयता हीच खरी शक्ती असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजात वावरताना येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांनी ही कार्यशाळा विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी असून आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी असल्याचे सांगितले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण काळाची गरज बनली असून काठी प्रशिक्षणातून शिस्त, संयम व धैर्य या गुणांचा विकास होतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच डॉ. पी. आर. महाजन यांनी विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा पूर्ण लाभ घेऊन मनातील भीती दूर करावी व आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन केले. या चार दिवसीय कार्यशाळेत नॅशनल मर्दानी स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती विद्यार्थिनी परी महाजन, रणरागिणी मर्दानी आखाडा, रावेर येथील प्रशिक्षक जीवन महाजन यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. काठी कशी हाताळावी, हल्ला व बचावाच्या प्राथमिक तंत्रांचा योग्य वापर, शारीरिक संतुलन, हालचालीतील चपळता व प्रसंगावधान या बाबींवर विशेष भर देण्यात आला. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष सराव करून आत्मसंरक्षणाच्या विविध पद्धती आत्मसात केल्या. कार्यशाळेच्या काळात विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. नियमित सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. केवळ काठी फिरवण्यापुरते मर्यादित न राहता मानसिक तयारी, भीतीवर मात करण्याचे तंत्र व स्वतःच्या सुरक्षेबाबत सजगता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. भारती पाटील, प्रा. ऋतुजा पाटील, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. धनश्री बखाल, प्रा. कोमल सुतार यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत बाविस्कर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पी. आर. महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हर्षल पाटील, अनिकेत पाटील व गोपाल पाटील यांनी परिश्रम घेतले. एकूणच आत्मनिर्भय अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेली ही काठी प्रशिक्षण कार्यशाळा विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य व सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणारी ठरली असून शैक्षणिक ज्ञानासोबतच जीवनोपयोगी कौशल्यांची जोड देणारा हा उपक्रम महाविद्यालयीन शिक्षण अधिक अर्थपूर्ण करणारा ठरल्याचे चित्र या कार्यशाळेतून समोर आले.




