तालुका प्रतिनिधी | चोपडा
भीम आर्मी जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुका युनिट भीम आर्मी भारत एकता मिशन (सामाजिक संघटना) यांच्या वतीने प्रशासनाच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात २६ जानेवारी रोजी पंचायत समिती, चोपडा येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आदिवासी भिल्ल समाजावर होत असलेला अन्याय तसेच शासन आदेशांचा जाणीवपूर्वक अवमान केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
(ads)
संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात कठोरा ग्रामपंचायत संदर्भातील गंभीर बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. कठोरा ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसतानाही पदावर कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी तात्काळ नोटीस देऊन नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
(ads)
तसेच सन २०२४ मध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या आदेशाचा जाणीवपूर्वक अवमान केल्याबद्दल कठोरा ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
(ads)
आदिवासी बांधवांना घरकुलासाठी जागा वाटप करण्यात अडथळा निर्माण करण्यासाठी जातीय मानसिकतेतून हरकती घेण्यात आल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. या प्रकरणात संबंधित तक्रारदारांच्या सह्यांची सखोल चौकशी करून खोट्या सह्या करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टसह अन्य संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
(ads)
यासोबतच लोणी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून शासन निधीच्या गैरवापराची वसुली करण्यात यावी व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. लोणी ग्रामपंचायतीची संपूर्ण व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास सरपंचासह संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी अपात्र ठरविण्याचीही मागणी संघटनेने केली आहे.
(ads)
वरील सर्व मागण्यांवर प्रशासनाने अद्याप तात्काळ निर्णय न घेतल्यामुळे २६ जानेवारी रोजी आमरण उपोषण करण्यात येणार असून, न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा ठाम इशारा भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने देण्यात आला आहे.उपोषण कर्ता राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर(भीम आर्मी जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख) , भीम आर्मी चोपडा तालुका अध्यक्ष मुबारक तडवी व भिल्ल समाज बांधव यांनी व
संघटनेने “शांतीत क्रांती”चा नारा देत प्रशासनाने जबाबदारीने निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे.



