चोपडा तालुक्यातील लोणी जिल्हा परिषद शाळेत पाण्याच्या मोटारीची धोकादायक विद्युत जोडणी; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
चोपडा तालुक्यातील लोणी जिल्हा परिषद शाळेत पाण्याच्या मोटारीची धोकादायक विद्युत जोडणी; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर 

लोणी ता. चोपडा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारीची विद्युत जोडणी अत्यंत धोकादायक पद्धतीने करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सदर ठिकाणी विद्युत वायरवरून वरून उघडी व असुरक्षित जोडणी (आकोडे) टाकण्यात आली असून त्यामुळे शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.

(ads)

शाळेत दररोज लहान-लहान मुले शिक्षणासाठी येत असून पाण्याच्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. चुकून एखाद्या विद्यार्थ्याचा त्या उघड्या विद्युत जोडणीला स्पर्श झाल्यास शॉक लागून गंभीर दुखापत किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, या ठिकाणी कोणतीही पर्यायी किंवा सुरक्षित विद्युत व्यवस्था उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

(ads)

या धोकादायक परिस्थितीबाबत गावातील पालक व नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना लोणी गावातील ग्रामस्थांनी वेळेत कारवाई न झाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

(ads)

सदर प्रकाराबाबत तात्काळ दखल घेऊन शाळेतील धोकादायक विद्युत जोडणी बंद करून सुरक्षित व्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच या निष्काळजीपणासाठी शाळेचे मुख्याध्यापक व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.

(ads)

दरम्यान, भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी व शाळा प्रशासनावर राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!