विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व संगणकशास्त्र विभागच्या वतीने उच्चशिक्षणातील विविध वाटा या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव यांनी भूषविले.
कार्यक्रमासाठी तज्ञ मार्दर्शक म्हणून आय. एम. आर. महाविद्यालय जळगाव येथील प्रा. डॉ. संदीप घोडके आणि प्रा. डॉ. सतीश दमाडे उपस्थित होते. प्रा. डॉ. संदीप घोडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना , “बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि करिअरच्या विविध संधींचा लाभ घ्यावा. सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यामुळेच यश निश्चित मिळते.” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सतीश दमाडे यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध क्षेत्रांतील संधी, शासकीय व खासगी क्षेत्रातील करिअर पर्याय, स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाची दिशा, तसेच मुलाखत कौशल्य व संवादकौशल्य याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारे स्वतःचे कौशल्य वाढवावे, नवीन अभ्यासक्रम व प्रशिक्षणाचा उपयोग करून रोजगारक्षम व्हावे यावर त्यांनी विशेष भर दिला. अध्यक्षीय भाषणात डॉ. सतीश वैष्णव यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून रोजगारक्षम कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर नियोजनाची गरज अधिक असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शकांचा परिचय प्रा. मिलिंद भोपे सर यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने याच्या मार्गदर्शना खाली महाविद्यालयातील प्रा. एच. एम. बाविस्कर, प्रा. एस. बी. महाजन, प्रा. कोमल सुतार, प्रा. वैष्णवी महाजन, प्रा. धनश्री बखाल, प्रा. अक्षय महाजन, प्रा. प्रदीप तायडे, श्री. हर्शल पाटील, श्री. श्रेयस पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा शेवट डॉ. संदीप साळुंके यांनी आभार प्रदर्शनाने केला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



