सध्या अनुसूचित जातीच्या एकूण आरक्षणाला त्या प्रवर्गातील एकूण जातीचे अ ब क ड असे उपवर्गिकरण करून विभागून देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे . अशी मागणी महाराष्ट्रात प्रामुख्याने मातंग समाज आधीपासूनच करत आला आहे . मातंग समाज त्याच्या मागासलेपणाचे कारण महार ( बौद्ध ) समाज असल्याचे सांगत आहे . आरक्षणाचा लाभ याच जातीने घेतला असा त्यांचा मुख्य आरोप आहे .
मातंग समाजाने या गोष्टीचा विचार केलेला दिसत नाही की , आरक्षण आहे याचा अर्थ ते कुणालाही मिळतं असे नाही . त्यालाही शिक्षण , वय , अनुभव आदी अटी असतातच . त्या त्या पदाकरीता विशिष्ट प्रकारचे शिक्षण व त्यात मेरिट तपासले जाते . याच बरोबर त्या उमेदवाराचे चारित्र्य बघितले जाते . त्याचे शिक्षण , वय , अनुभव , मेरिट वगैरे बाबतीत तो परिपूर्ण असेलही मात्र त्याच्यावर काही गुन्हा पोलीस दप्तरी आहे का ? याची सुद्धा पडताळणी केली जाते या शिवाय त्याची वैद्यकीय तपासणी सुद्धा होते . या सर्व बाबतीत तो यशस्वी ठरला तरच त्याची निवड होत असते . निव्वळ ' मागासलेला ' आहे म्हणून नोकरी वा अन्य सवलती मिळत नसतात .
मातंग समाज सुरवाती पासूनच शैक्षणिक क्षेत्रात मागं राहिलेला आहे . महात्मा फुले यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली तेंव्हा पासून हा समाज शिक्षणापासून स्वतःला दूर ढेवत आला आहे . आधीचा काळ सोडून दिला तरी भारताला संविधान लागू झाल्यानंतर सुद्धा हा समाज शिक्षणाच्या प्रवाहात अल्प प्रमाणात सहभागी झाला . अगदी २००१ नंतरची शैक्षणिक स्थिती बघितली तर प्राथमिक स्तरावरच या समाजात गळतीचे प्रमाण अधिक राहिले आहे . अनुसूचित जातीतील अन्य जातीच्या तुलनेत मातंग समाजातील गळतीचे प्रमाण हे सर्वाधिक म्हणजे २२.७७ टक्के येवढे राहिले आहे . सर्वात कमी गळतीचे प्रमाण हे चांभार जातीचे आहे ते फक्त १.८४ टक्के एवढे अल्प आहे . आश्चर्याची बाब म्हणजे महार ( बौद्ध ) जातीत गळतीचे प्रमाण ११.०० टक्के असल्याचे दिसून येते .
माध्यमिक स्तरावर मातंग समाजाची गळती तर भयानक आहे . ५१.७४ टक्के मुलं, मुली माध्यमिक शिक्षण मध्येच सोडून देतात . जी काही हे शिक्षण घेतात त्यातील जवळ जवळ २९.६१ टक्के विद्यार्थी मॅट्रिकची परीक्षाच देत नाहीत . यातही चांभार जातीतील गळतीचे प्रमाण सर्वात कमी ०९.०० टक्के राहिलेले आहे . मॅट्रीक नंतर शिक्षण घेतांना पुन्हा मातंग समाजातील ५७.५४ टक्के विद्यार्थी पुढील शिक्षण घेत नाहीत . यात महार ( बौद्ध )जातीचे गळतीचे प्रमाण ४६.६९ एवढे आहे .पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यात हा समाज मागं आहे या स्तरावर त्याच्यात गळतीचे प्रमाण ४२.४९ टक्के एवढे आहे . २००१ नंतर चांभार समाज शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहे . आज त्यांच्यात पदवीधर व पुढील शिक्षण घेणारे विद्यार्थी या प्रवर्गातून सर्वाधिक आहे .
मातंग समाजातील शैक्षणिक मागासलेपण हे एक कारण त्याच्या विकासाच्या आड येते . दुसरे महत्त्वाचे कारण मातंग समाज आजच्या आधुनिक व डिजिटल युगात सुद्धा दोरखंड तयार करणे , झाडू बनविणे , टोपली विणणे , डफळी वाजविणे सारखी परंपरागत व्यवसाय करतो . या व्यवसायाला आता फारसी मागणी नसल्याने आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत कमी होत गेला . महाराष्ट्राची लोककला म्हणून प्रसिद्ध असलेल्या तमाशात हा समाज आधी खूप होता पण आता तमाशा सहसा कोणी ठेवत नाही , अंत्ययात्रेत आता कोणी डफळी वाजवत नाही यामुळे सुद्धा हा समाज आर्थिक क्षेत्रात मागास आहे . जुनाट प्रथा , परंपरा पाळून जीवन जगत आहे . आजही हा समाज गुन्हेगारी समाज म्हणून ओळखला जात असल्याने पोलीस विभाग त्यांच्यावर पाळत ठेवून असतो अश्या काही कारणांनी सुद्धा या समाजाची आर्थिक प्रगती होऊ शकली नाही . त्यांच्यात आजही स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे . स्थलांतरा मुळे तसेच १९६१ नंतर या समाजाने मोठयाप्रमाणात धर्मांतर केल्याने मातंग समाजाची लोकसंख्या कमी - कमी नोंद होत गेली आहे . त्यामुळे हा समाज १९११ ची जनगणना गृहीत धरावी असे सांगतो .
२०११ च्या जनगणने नुसार महाराष्ट्रात १५ टक्के असलेल्या अनुसूचित जातीत महार ( बौद्ध ) ६२ टक्के , मातंग १९ टक्के , चर्मकार १४ टक्के तर इतर ५ टक्के असे प्रमाण आहे . लोकसंख्येच्या प्रमाणात उपवर्गिकरण केले तर मातंग समाजाच्या वाट्याला २.८५ टक्के आरक्षण येते . या समाजाने मात्र ५ टक्क्येची मागणी केली आहे . २००३ मध्ये नेमलेल्या ' लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने ' सुद्धा मातंग समाजा करिता ५ टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे . २५० पानी या अहवालात मातंग समाजाच्या उन्नती करिता एकूण ८० शिफारसी करण्यात आल्या आहेत.
आज अनुसूचित जातील मिळणाऱ्या १५ टक्के आरक्षणावर या प्रवर्गातील सर्व ५८ जाती दावा करत आले , त्या प्रमाणे लाभ घेत आले आहेत . त्याच आधारे आज महार ( बौद्ध ) समाज चांभार समाजाच्या तुलनेने मागं आहे . चांभार समाजाचे नोकरीतील , शैक्षणिक क्षेत्रातील , राजकीय क्षेत्रातील प्रमाण महार , मांग व अन्य अनुसूचित जातीतील समाजापेक्षा अधिक आहे त्याच्या या अधिक प्रमाणाला कोणीही विरोध केलेला नाही व विरोध करण्याचे कारण सुद्धा नाही .आज चांभार समाज महार ( बौद्ध ) समाजाच्या पुढं आहे , चांभार समाजाचे अनुकरण मातंग समाजाने केले तर भविष्यात तो या दोघं समाजाच्या पुढं जाऊ शकतो . उद्या उपावर्गिकरण झाले तर मातंग समाजाला २.८५ टक्के आरक्षण मिळेल त्याच्या मागणी प्रमाणे जर ५ टक्के आरक्षण दिले तर इतर जाती त्या विरोधात रस्त्यावर उतरतील वा न्यायालयात आव्हान देतील . तेंव्हा आज फक्त महार जातीच्या विरोधात ओरडणारा हा मातंग उद्या इतर जातीच्या विरोधात ओरडेल व तो एकाकी पडून पुन्हा आपल्या आर्थिक मागासलेपणाचे एक नवे संकट ओढवून घेणार .
मातंग समाजाने वैचारिक , बौध्दीक , तार्किक दृष्ट्या व भविष्याचा वेध घेऊन या उपवर्गिकरणाचा विचार करावा नाहीतर या समाजाच्या पुढाऱ्यांची अक्कल अ ब क ड पुरतीच सीमित होती असे लोक म्हणतील .
लेखक जयसिंग वाघ
अजिंठा हाउसिंग सोसायटी, अजिंठा चौक , जळगाव
संपर्क. ९८८१९२८८८१







